मोक्याच्या क्षणी कुणी न कुणी तरी उभे राहून अडचणीत सापडलेली संघाची नाव स्थिरस्थावर करतो, हे आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत पाहायला मिळाले आहे आणि याचीच प्रचीती तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही आली. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत ऑस्ट्रेलियाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला खरा, पण सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि शॉन मार्श यांनी दमदार अर्धशतके झळकावत संघाला दिवसअखेर ७ बाद २६१ अशी मजल मारून दिली आहे. ऑस्ट्रेलियाकडे सध्याच्या घडीला ३२६ धावांची आघाडी असून भारतासाठी पाचव्या दिवशी हे आव्हान पेलणे कठीण दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे पारडे सध्याच्या घडीला जड असून, मंगळवारी भारतीय संघ किती धावांमध्ये त्यांचा डाव गुंडाळतो, यावर या सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.
८ बाद ४६२ वरून पुढे खेळताना भारताला दोन फलंदाजांच्या मोबदल्यात फक्त तीनच धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर (४०) आणि ख्रिस रॉजर्स यांनी ५७ धावांची सलामी दिली. वॉर्नर एकामागून एक तडफदार फटके मारत असताना त्याला थोपवणे अशक्य दिसत होते, पण आर. अश्विनने वॉर्नरला तंबूत धाडत ही जोडी फोडली. वॉर्नरने ४२ चेंडूंत ६ चौकारांच्या जोरावर ४० धावा फटकावत संघाला जलद सुरुवात करून दिली. त्यानंतर ठरावीक फरकाने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत असले, तरी रॉजर्सने समर्थपणे भारतीय गोलंदाजांचा सामना करत अर्धशतकी खेळी साकारत संघाला दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला. रॉजर्सने ८ चौकारांच्या जोरावर ६९ धावांची खेळी साकारली. भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टिव्हन स्मिथला (१४) या डावात छाप पाडता आली नाही, पण कोणाच्याही खिजगणतीत नसताना संघाचा डाव सावरला तो शॉन मार्शने. एकेरी-दुहेरी धावा काढतानाच मध्येच षटकार लगावत मार्श चाळिशीमध्ये पोहोचला, त्यानंतर आर. अश्विनला सुरेख षटकार लगावत मार्शने अर्धशतक झळकावले.
ऑस्ट्रेलियाने दमदार आघाडी घेतली असली तरी त्यांनी अजूनही डाव घोषित केलेला नाही. मंगळवारी मार्शच्या खेळीवर ऑस्ट्रेलियाच्या नजरा असतील. दुसरीकडे भारतासाठी ऑस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करणे, आव्हानात्मक असेल. भारताकडून इशांत शर्माने भेदक मारा केला, पण त्याला दोन विकेट्सवरच समाधान मानावे लागले. आर. अश्विन आणि उमेश यादव यांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) ५३०
(दुसरा डाव) : डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. अश्विन ४०, ख्रिस रॉजर्स त्रि. गो. अश्विन ६९, शेन वॉटसन झे. धोनी गो. इशांत शर्मा १७, स्टिव्हन स्मिथ झे. रहाणे गो. यादव १४, शॉन मार्श खेळत आहे ६२, जो बर्न्‍स झे. धोनी गो. इशांत शर्मा ९, ब्रॅड हॅडिन झे. धोनी गो. यादव १३, मिचेल जॉन्सन झे. रहाणे गो. शमी १५, रायन हॅरीस खेळत आहे ८, अवांतर (लेग बाइज ८, वाइड १, नो बॉल ५) १४, एकूण ७५ षटकांत ७ बाद २६१.
बाद क्रम  १-५७, २-९८, ३-१३१, ४-१६४, ५-१७६, ६-२०२, ७-२३४.
गोलंदाजी : उमेश यादव १४-१-७३-२, मोहम्मद शमी २०-२-७५-१, इशांत शर्मा १९-४-४९-२, आर. अश्विन २२-२-५६-२.

वाग्युद्ध सुरूच
मिचेल जॉन्सन आणि विराट कोहली यांच्यातील वाग्युद्ध सोमवारी दुसऱ्या डावाताही सुरुच राहिले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जॉन्सन बाद झाल्यानंतर कोहलीने त्याला उद्देशून शेरेबाजी केली. ‘अरे ला कारे’ उत्तर देण्याची प्रवृत्ती असणाऱ्या जॉन्सननेही तात्काळ प्रत्युत्तर दिले. मात्र हे शब्द कोहलीला उद्देशून होते की पंचांकडे कोहलीची तक्रार करण्यासाठी हे समजू शकले नाही. कारण पंचांनी लगेचच कोहलीशी बातचीत केली. वाक्युद्धाने वातावरण बिघडू नये यासाठी पंचांनी हस्तक्षेप करत अनुचित प्रसंग टाळला.

विराट कोहलीला आपल्या मनाप्रमाणे खेळू शकतो. त्याने मर्यादेचे उल्लंघन केले तर त्याकरिता आयसीसीचे नियम आहेत. मिचेल जॉन्सन आणि ब्रॅड हॅडिन या दोन्ही खेळाडूंना उद्देशून त्याने टिप्पणी केली. आम्हीही आक्रमक क्रिकेट खेळतो. मैदानावर जे होते ते तिथेच सोडून द्यावे. या गोष्टी मनात ठेवणे योग्य नाही. काय बोलायचे, काय नाही हे त्याच्यावर आहे. शेरेबाजीला मर्यादा असते आणि ती ओलांडल्यास शिक्षा देण्यासाठी यंत्रणा आहे.
डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज

शेवटच्या दिवशी पाठलाग करणे आव्हानात्मक
सामना कोणत्या संघाच्या दिशेने झुकला आहे, हे सांगता येणार नाही. आम्ही सकारात्मक वृत्तीनेच शेवटच्या दिवशीही खेळणार आहोत. मात्र पाचव्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करणे आव्हानात्मक असेल. मंगळवारी सकाळी त्यांचा डाव झटपट गुंडाळण्याचा आमचा प्रयत्न असेल. सामना जिंकण्याच्या उद्देशानेच आम्ही खेळू. पहिल्या डावाच्या तुलनेत आम्ही शिस्तबद्ध गोलंदाजी केली.
रवीचंद्रन अश्विन, भारताचा फिरकीपटू

स्कोअरकार्ड-