केदार जाधवचे झंझावाती शतक; जगदीश झोपेचे पाच बळी

Vasant More has many cars gold and silver
वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी
lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Nana Patole
अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव याने कर्णधारपदास साजेसा धडाकेबाज खेळ करीत शतक टोलविले, त्यामुळेच महाराष्ट्राला विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ दिल्लीविरुद्ध १९५ धावांनी विजय मिळविता आला. जगदीश झोपे याने पाच गडी बाद करीत महाराष्ट्राच्या विजयास हातभार लावला.

महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ३६७ धावांचा डोंगर रचला. त्यामध्ये केदारने केलेल्या आक्रमक ११३ धावा तसेच त्याने नौशाद शेख (५२) याच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीचा मोठा वाटा होता. दिल्लीकडून गौतम गंभीर याने शैलीदार अर्धशतक टोलवूनही त्यांचा डाव ३३.४ षटकांत अवघ्या १७२ धावांमध्ये कोसळला. महाराष्ट्राकडून जगदीश झोपे याने पाच विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दिल्लीस चांगलाच महागात ठरला. महाराष्ट्राने विजय झोल (३५) याच्यासह पहिले दोन गडी जरी ७९ धावांत गमावले तरीही दिल्लीस या सामन्यावर पकड घेता आली नाही. नौशाद याच्या साथीत केदारने चौफेर फटकेबाजी करीत मैदान दणाणून सोडले. या जोडीने १०७ धावांची झंझावती भागीदारी करीत सामन्याला कलाटणी दिली. नौशाद याने आठ चौकारांसह ५२ धावा केल्या. केदार याने केवळ ८३ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या. त्यामध्ये ११ चौकारांबरोबरच आठ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. केदार याने नौशादच्या जागी आलेल्या अंकित बावणे याच्या साथीत ५९ धावांची भर घातली. बावणे याने एक चौकार व दोन षटकारांसह २९ धावा केल्या.

विजयासाठी ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गंभीर याने शिखर धवन याच्या साथीत ९.४ षटकांत ६४ धावांचा पाया रचला. तथापि ही जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. गंभीर याने सात चौकारांसह ५३ धावा केल्या. धवन याने २४ धावा केल्या. मधल्या फळीत मिलिंदकुमार (३८) व मनन शर्मा (नाबाद २१) यांच्यासह दिल्लीच्या फलंदाजांना महाराष्ट्राच्या प्रभावी माऱ्यापुढे आक्रमक खेळ करता आला नाही. झोपे याने केवळ १९ धावांमध्ये पाच गडी बाद केले. प्रदीप दाढे याने दोन बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

  • महाराष्ट्र ५० षटकांत ८ बाद ३६७ (विजय झोल ३५, नौशाद शेख ५२, केदार जाधव ११३, अंकित बावणे २९, कुलवंत खेजरोलिया २/३४, नवदीप सैनी २/७६, नितीश राणा २/४२)
  • दिल्ली ३३.४ षटकांत सर्वबाद १७२ (शिखर धवन २४, गौतम गंभीर ५३, मिलिंदकुमार ३८, मनन शर्मा नाबाद २१, जगदीश झोपे ५/१९, प्रदीप दाढे २/४८).