* पुरुषांमध्ये रेल्वेची मक्तेदारी संपुष्टात
महाराष्ट्राने वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकूट जिंकण्याची किमया साधली. महाराष्ट्राने पुरुष गटात रेल्वे संघाची मक्तेदारी मोडून काढली, तर महिलांमध्ये कर्नाटकला हरवले.
पार्क स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने पुरुषांच्या अंतिम लढतीत रेल्वे संघाचा १५-१४ असा पराभव केला. त्याचे श्रेय अनिकेत पोटे (१ मि. संरक्षण व ३ गडी), मुकेश गोसावी (१मि.४० सेकंद व ३ गडी), दीपक माने (दीड मिनिटे व ४ गडी) यांच्या अष्टपैलू कामगिरीला द्यावे लागेल. नरेश सावंत (१ मि.संरक्षण) व मिलिंद चावरेकर (१ मि.संरक्षण) यांनी त्यांना चांगली साथ दिली. रेल्वेकडून राहुल नायगावे (२ मिनिटे), रंजन शेट्टी (१ मि.२० सेकंद व ५ गडी), योगेश मोरे (एक मिनिट व १ मि.५० सेकंद) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ८-६ अशी एक डाव, एक डाव आणि २ गुणाने मात केली. महाराष्ट्राच्या विजयात श्वेता गवळी (३ मि., २ मि.२० सेकंद व एक गडी), सारिका काळे (२ मि.५० सेकंद), ऐश्वर्या सावंत (३ मि.१० सेकंद व ३ मि. तसेच एक गडी), सुप्रिया गाडवे (१मि.५० सेकंद व ३ मिनिटे) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.
महाराष्ट्राच्या मिलिंद चावरेकरला एकलव्य पुरस्कार तर, श्वेता गवळीला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला.