यजमान वेस्ट हॅम युनायटेडचा नाटय़मयरीत्या विजय; सामन्यापूर्वी प्रेक्षकांकडून पाहुण्यांच्या गाडीवर बाटलीफेक
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेतील अव्वल संघांपैकी एक मँचेस्टर युनायटेडचा चॅम्पियन्स लीगच्या २०१६-१७च्या हंगामातील प्रवेश टांगणीवर गेला आहे. मंगळवारी मध्यरात्री लंडन येथील बोलीयन मैदानावर झालेल्या ईपीएलच्या अखेरच्या साखळी सामन्यात यजमान वेस्ट हॅम युनायटेडने नाटय़मयरीत्या मँचेस्टरवर ३-२ असा विजय मिळवला. या पराभवामुळे मँचेस्टरला ईपीएलच्या गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आशा जरतरच्या निकालांवर गेल्या आहेत.
सामन्यापूर्वी वेस्ट हॅमच्या चाहत्यांनी मँचेस्टरच्या बसवर बाटल्या फेकल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सामना काही काळ उशिरा सुरु झाला. या तणावाच्या स्थितीनंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट हॅमने १०व्या मिनिटाला डायफ्रा सॅखोच्या गोलवर १-० अशी आघाडी घेतली. त्याला मध्यंतरानंतर मँचेस्टरच्या अँटोनी मार्शलने (५१ व ७२ मि.) दोन गोल करून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.
वेस्ट हॅमवर पराभवाचे ढग घोंगावलेले असताना स्टेडिमयमध्ये स्मशानमय शांतता पसरली होती. मात्र ७६व्या मिनिटाला मिचेल अँटोनीओच्या अप्रतिम हेडरने वेस्ट हॅमला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. चार मिनिटांनंतर विंस्टन रेडने कॉर्नरवरून आलेला चेंडू हेडरद्वारे गोलजाळीत टाकून वेस्ट हॅमला ३-२ असे आघाडीवर आणले. या गोलमुळे चैतन्य संचारलेल्या वेस्ट हॅमने अखेरच्या दहा मिनिटांत बचावात्मक खेळ करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
मँचेस्टरचे प्रशिक्षक लुईस व्हॅन गाल यांनी या पराभवाला सामन्यापूर्वी रंगलेल्या हिंसेला जबाबदार ठरवले. ते म्हणाले, ‘माझ्या प्रदीर्घ कारकीर्दीत अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही, परंतु आमच्या संघातील अनेक खेळाडूंना असा अनुभव यापूर्वी कधीच आलेला नाही. त्यामुळेच संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला.’ या पराभवामुळे मँचेस्टरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे आणि मँचेस्टर सिटी चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीगची पात्रता मिळवण्यासाठी त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात विजयाबरोबर, मँचेस्टर सिटीच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. त्यांना अखेरच्या सामन्यात बॉर्नमाऊथचे आव्हान असेल, तर सिटीला स्वानसी सिटीचा सामना करावा लागणार आहे.
वेस्ट हॅम युनायटेडविरुद्ध प्रीमिअर लीग स्पध्रेत झालेल्या १५ सामन्यांतील मँचेस्टर युनायटेडचा हा पहिलाच पराभव आहे.