गडचिरोली, भामरागड अशी नावं उच्चारताच नकाशातील उजवीकडचं आपल्या राज्याचं टोक डोळ्यांसमोर तरळतं. आदिवासीबहुल असा हा भाग. नक्षलवादी, हिंसा यासंदर्भातील बातम्या नेहमीच्याच. ‘टेनिस’ हा शब्दही या परिसरात विसंगत वाटावा असा. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातले खासगी जिमखाने आणि क्लब्सची मक्तेदारी असणारा खेळ हा प्रचलित समज. रोजचं जगणंच संघर्षमय आहे अशा प्रांतात टेनिसची रुजवात होणं अवघडच, मात्र महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आणि नागपूरच्या आदिवासी विकास विभागातील तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे शक्य झालंय. विशेष म्हणजे हंगामी चळवळ न राहता या भागातल्या युवक-युवतींना टेनिसच्या माध्यमातून स्वकर्तृत्वाच्या बळावर रोजगारही मिळू लागला आहे. सरकार आणि खेळाची संघटना यांची योजना म्हणजे लालफितीचा कारभार असाच होरा. असंख्य चांगल्या योजना कागदावर आकर्षक आणि उपयुक्त असतात. मात्र अंमलबजावणी टप्प्यापर्यंत त्या पोहचतच नाहीत. ‘कौशल्य विकास आदिवासी टेनिस कार्यक्रम’ या सगळ्या रूढ समजांना अपवाद ठरला आहे. ‘रॅकेट’ या शब्दाभोवती नकारात्मक भावना दूर होऊन रॅकेटच्या माध्यमातून रोजगार चळवळ निर्माण झाली आहे.

ठरावीक वेळेच्या अभ्यासक्रमाद्वारे एकदम टेनिसपटू घडवणं अवघड आहे. परंतु वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर लहान मुलांना मार्गदर्शन करू शकतील असे प्रशिक्षक तयार करता येऊ शकतात. कालांतराने प्रगत प्रशिक्षकापर्यंतची वाटचाल ते करू शकतील, या विचारातून वर्षभराचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. सज्ञान युवक-युवतींना टेनिसचं प्रशिक्षण देताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल कसा आणता येईल, यावरही विचार झाला. जिल्ह्य़ातल्या विविध भागांमधील मुला-मुलींना सोयीचं व्हावं मिळून नागपूर प्रशिक्षण केंद्र झालं. अखिल भारतीय टेनिस संघटनेतर्फे प्रमाणित प्रशिक्षक अर्जुन सुतार आणि कपिल चुतेले यांच्याकडे मार्गदर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघातर्फे प्रमाणित प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि मनोज वैैद्य यांनीही वर्षभरादरम्यान शिबिरार्थीना असंख्य बारकावे शिकवले. सुटय़ांमध्ये चालणारा हौशी अभ्यासक्रम नसल्यानं शिबिरार्थीचं दररोजचं वेळापत्रक ८ तासांचं असे. खेळाचं साहित्य, अन्य उपकरणं आणि तांत्रिक मदतीची आघाडी राज्य टेनिस संघटनेनं सांभाळली, तर शिबिरार्थीची राहण्या-जेवण्याची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आली. खेळांची आवड असणारे किंवा स्वत: एखादा खेळ खेळणाऱ्या शिबिरार्थीचीच अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. मात्र टेनिससारखा सर्वस्वी नवा खेळ समजून घेताना भाषेची अडचण आली. त्यासाठी अभ्यासाचं साहित्य मराठीत भाषांतरित करण्यात आलं.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
UPSC third topper Ananya Reddy
पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये तिसरे स्थान! पाहा, कशी केली अनन्या रेड्डीने परीक्षेची तयारी…
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी

प्रशिक्षक म्हणून स्वतंत्रपणे कारकीर्द घडवता येईल, यासंदर्भात सरकारी, खासगी तसंच संघटनेच्या पातळीवर विचार होताना दिसत नाही. राज्यातल्या सक्रिय खेळ संघटनांपैकी एक असलेल्या लॉन टेनिस संघटनेने याबाबत पुढाकार घेतला. थेट ऑलिम्पिकची उडी मारण्याऐवजी पायाभूत पातळीवर प्रशिक्षकांची फळी तयार करता येईल का हा विचार होता. नागपुरातील अतिरिक्त आयुक्तांकडून पाठबळ मिळालं आणि हा अभ्यासक्रम साकारला. महानगरापासून दूर असणाऱ्या युवक-युवतींना या निमित्ताने मुख्य प्रवाहात आणता येईल, हा उद्देशही सफल झाला. शारीरिक आणि मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले तरुणतरुणी राज्यात तसेच हैदराबाद, दिल्ली येथील टेनिस अकादमी, क्लब्स येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आदिवासीबहुल भागात उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  राज्यातल्या अन्य भागांमध्ये याच धर्तीवर उपक्रम कार्यान्वित करता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. टेनिस म्हणजे सधन वर्गाचा खेळ. त्यातच खेळण्यासाठी सार्वजनिक कोर्ट्स उपलब्ध नसल्याने खेळाच्या वाढीला मर्यादा आल्या होत्या. आदिवासी भागात उपजत नैपुण्य खूप आहे. काटक शरीराचं वरदान लाभलेलं असतं. पण खेळण्याची साधनं आणि पैसा नसल्याने या भागातले खेळाडू पिछाडीवर राहतात. हे ध्यानात घेऊन टेनिससारख्या मखरातल्या खेळाला गावाखेडय़ातल्या मुलांपर्यंत न्यायचे असेल तर त्याच परिसरात निर्माण झाले तर खेळाची चळवळ रुजेल ही संकल्पना होती. २०१४मध्ये उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. राज्य पातळीवरील उपक्रमातून प्रेरणा घेत राष्ट्रीय पातळीवरील काही भागांना टेनिस साक्षर करण्यासाठी अखिल भारतीय टेनिस संघटना (आयटा) आणि केंद्र सरकारचा कौशल्य विकास मंत्रालय यांच्या विचारातून ‘प्रोजेक्ट एकलव्य’चा प्रस्ताव विचाराधीन आहे.

कौशल्य विकास आदिवासी टेनिस कार्यक्रम रूपरेषा

  • वर्षभराचा पूर्णवेळ कार्यक्रम
  • खेळसाहित्य आणि तांत्रिक गोष्टींची जबाबदारी राज्य टेनिस संघटनेकडे तर राहण्या-जेवण्याची व्यवस्था सरकारकडे.
  • सुरुवातीचे सहा महिने टेनिस खेळातील प्राथमिक संकल्पनांची ओळख.
  • वर्षभरानंतर तोंडी, लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिबिरार्थीची क्लब्स तसेच राज्य, राष्ट्रीय पातळीवरील केंद्रांकडे शिफारस.
  • अव्वल प्रदर्शन करणाऱ्या शिबिरार्थीना राज्य संघटनेच्या प्रशिक्षकांसाठीच्या प्रथम स्तर परीक्षेसाठी तयारी.
  • परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकणारे शिबिरार्थी पंच तसेच तांत्रिक कामांमध्ये सहभागी.

निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने तंदुरुस्तीच्या बाबतीत कोणतीही अडचण नव्हती. काटक असल्याने दिवसभराच्या भरगच्च वेळापत्रकानंतरही ते थकायचे नाहीत. त्यांची शिकण्याची तयारी होती आणि उत्साहही होता. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मोठा कार्यक्रम झाला होता. वर्षभरापूर्वी जेमतेम बोलणाऱ्या मुलामुलांनी दोनशेहून अधिक लोकांसमोर सुरेख शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तो क्षण सुखावणारा होता. कर्तृत्वाच्या बळावर ते देशभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. अशाच स्वरुपाचा उपक्रम नाशिक आणि ठाण्यात राबवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.  हेमंत बेंद्रे, आयटीएफ प्रशिक्षक

आदिवासींसाठी काही करता यावं म्हणून अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. कौशल्य विकासासाठी योजना आखून अंमलबजावणी करण्याचे अधिकार आम्हाला होते. खेळांच्या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकतो यावर विचार झाला. टेनिसच्या माध्यमातून उपक्रम राबवता येईल का, अशी विचारणा राज्य टेनिस संघटनेकडे केली. त्यांनी या विचाराला बळ दिलं. चांगले खेळाडू घडण्यासाठी प्रशिक्षकांची फौज आवश्यक आहे हे लक्षात आलं. त्यादृष्टीने नागपूर जिल्ह्य़ात ६ प्रकल्प अधिकाऱ्यांनी १८ वर्षे पूर्ण झालेले आणि खेळांची आवड असणाऱ्या ४० मुला-मुलींची निवड केली. गडचिरोली, भामरागड अशा दुर्गम भागातले प्रशिक्षणार्थी होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी नागपूर शहरात प्रशिक्षण देण्यात आलं. राहण्या-जेवण्याची व्यवस्था सरकारने केली तर प्रशिक्षणाचं काम टेनिस संघटनेने केलं. दररोज ८ ते ९ तास खडतर असं प्रशिक्षण चालत असे. हा उपक्रम हौशी पातळीवर न राहता त्यातून युवक-युवतींना आर्थिक स्थैर्य मिळायला हवं हा विचार होता. वर्षभरानंतर प्रशिक्षणार्थीनी राज्य टेनिस संघटनेची प्रशिक्षणाची ‘प्रथम स्तर’ परीक्षा दिली. आजच्या घडीला बहुतांशी जण राज्य तसेच देशभरात कार्यरत आहेत. सरकार आणि राज्य संघटना दोन्ही आघाडय़ांवर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने अंमलबजावणी झाल्याने प्रकल्पाचा हेतू साध्य झाला.  पल्लवी दराडे, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास

मला खेळांची आवड होती, म्हणूनच माझी निवड झाली होती. टेनिसची धुळाक्षरं अभ्यासक्रमादरम्यान गिरवली. त्याचवेळी प्रशिक्षकाने तंदुरुस्त असणं अत्यावश्यक आहे हे बिंबवण्यात आलं. त्यामुळे स्वत: तंदुरुस्त राहण्यासाठी कसोशीने मेहनत घेऊ लागले. वर्षभरानंतर लेव्हल १ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि हैदराबादला काम करण्याची संधी मिळाली. महिनाभराने पहिला पगार झाला. माझं शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. खेळाच्या माध्यमातून कमवू लागले, याचा प्रचंड आनंद झाला. पगाराची रक्कम कमी असली तरी समाधान अतीव होते. पालक आपल्यासाठी किती कष्ट घेतात, याची जाणीव झाली. सध्या मी दिल्लीत एका अकादमीत प्रशिक्षक म्हणून काम करते आहे. दिल्लीमुळे घरच्यांना काळजी होती. पण आता इथे स्थिरावले आहे.  नेहा उके, उपक्रम शिबिरार्थी आणि प्रशिक्षक

व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरीय पातळीपर्यंत खेळलो होतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. त्यावेळी या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. वर्षभराचं प्रशिक्षण खडतर होतं पण ते व्यवसायाभिमुख होतं. नागपूर शहरापासून ५००-६०० किलोमीटर अंतरावर आंध्र प्रदेश सीमेनजीक कुसळ हे माझं गाव. वस्ती दीडशे लोकांची. या योजनेमुळे टेनिसची समज वाढली. वर्षभरानंतर आत्मविश्वास मिळाला. पुण्याजवळच्या बालेवाडीत काम करतोय. लहान मुलं तसेच व्यावसायिक खेळाडूंना प्रशिक्षण देतो. इतक्या लोकांसमोर बोलणंही पूर्वी अवघड वाटायचं. आता सहजपणे बोलू शकतो. या उपक्रमामुळे आर्थिक स्थैर्य लाभलंच आणि व्यवहारकुशल झालो.    उमेश गेडाम, उपक्रम शिबिरार्थी आणि प्रशिक्षक

सर्व अभ्यास साहित्य इंग्रजीऐवजी मराठीत भाषांतरित केलं. अभ्यासक्रमात टेनिसचा इतिहास, नियम, कोर्टचे प्रकार, फटक्यांमधील तांत्रिक बारकावे, टेनिस कोर्टची देखभाल, पंचांची जबाबदारी असा सर्वसमावेशक अभ्यासक्रम होता. काम करताना ते परिपूर्ण असावेत याचा सर्वतोपरी विचार करण्यात आला. टेनिस खेळाबाबत जागरूक होतानाच माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास रुजावा यासाठी विशेष लक्ष देण्यात आले.   सुंदर अय्यर, सचिव राज्य लॉन टेनिस संघटना