धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे. ज्या वेळी आधुनिक शस्त्रे उपलब्ध नव्हती, त्या वेळी अनेक युद्धांमध्ये सवरेत्कृष्ट धनुर्धाऱ्यांचाच विजय होत असे. भारतीय संस्कृतीमधील रामायण-महाभारतामधील युद्धे धनुर्विद्येवरच आधारित होती. असे असूनही या क्रीडा प्रकारात भारताला एकही ऑलिम्पिक पदक मिळवता आलेले नाही. ऑलिम्पिक पदकांचा ध्यास ठेवत येथील ‘आर्चर्स अकादमी ऑफ एक्सलन्स’ ही संस्था या खेळाचा तळागाळापासून विकास करण्यासाठी कार्यरत आहे.

क्रिकेट, फुटबॉल, टेनिस आदी लोकप्रिय खेळांच्या झगमगाटापुढे धनुर्विद्या हा क्रीडाप्रकार अपेक्षेइतका लोकांच्या मनावर प्रभाव पाडू शकलेला नाही. एखादा िलबाराम आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये चमक दाखवीत ऑलिम्पिकपर्यंत झेप घेतो, तेव्हा त्याचा खेळ कोणता आहे, याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते. जेव्हा त्याचा खेळ कळतो, तेव्हा अरे हा तर आपला प्राचीन खेळ असल्याची जाणीव लोकांना होते. मात्र या खेळासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी मात्र फारसे हात पुढे येत नाही. त्यामुळेच या खेळाची संस्था चालवणे म्हणजे पदरमोड करीतच विकासाचे कार्य करण्याखेरीज संघटकांपुढे अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. आर्चर्स अकादमीलाही मैदान मिळण्यापासून सर्वच गोष्टींबाबत संघर्ष करावा लागला आहे. या खेळाच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या रणजित चामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली १६ वर्षे अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
palghar geography garden marathi news
पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील विविध अंतरांच्या स्पर्धासाठी साधारणपणे फुटबॉल किंवा क्रिकेटच्या मैदानाच्या निम्मे आकाराचे मैदान आवश्यक असते. लहान जागेत १० मीटर, २५ मीटर, ५० मीटर आदी अंतराच्या स्पर्धाचा सराव करता येत असला, तरीही जेवढे मैदान मोठे असेल, तेवढा या खेळाचा सराव अधिक चांगला करता येतो. त्यामुळेच मोठे मैदान मिळवण्यासाठी आर्चर्स अकादमीला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन, विखे-पाटील प्रशाला आदी संस्थांमध्ये या अकादमीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला १०-१२ खेळाडूंची संख्या आता तीन आकडी झाली आहे. केवळ पुण्यातील नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून या अकादमीत खेळाडू प्रशिक्षणासाठी येत असतात. अधूनमधून अन्य राज्यांमधूनही या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक खेळाडू येतात, हीच या अकादमीच्या कार्याची पावती आहे. कटारिया प्रशाला, महावीर प्रशाला, दिल्ली पब्लिक स्कूल, गंगाधाम सोसायटीसमोरील मोकळी जागा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शाहू विद्यामंदिर महाविद्यालय, महेश बालभवन आदी ठिकाणी या अकादमीतर्फे खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

या अकादमीतून प्रशिक्षण घेणारे प्रवीण जाधव, तन्मय मालुसरे, भाग्यश्री कोलते यांची आगामी ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण शिबिराकरिता निवड झाली आहे. या खेळाडूंप्रमाणेच स्वप्निल ढमढेरे, मेघा अगरवाल, पूर्वा पल्लिवाल, साक्षी शितोळे आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे. राष्ट्रीय स्तरावरील शिबिराकरिता या अकादमीतील १५हून अधिक खेळाडूंची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र संघातील ७० टक्के खेळाडू या अकादमीतून तयार झालेले असतात. अमोल बोरिवले, आदिल अन्सारी, श्रीनिवास आदी अपंग खेळाडूंनाही या अकादमीत प्रशिक्षण मिळाले आहे. पुणे शहराबरोबरच राज्यात अन्यत्रही या अकादमीचे प्रशिक्षक नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत. नवोदित खेळाडू, हौशी खेळाडू व व्यावसायिक अशा विविध स्वरूपाद्वारे प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असते. अलीकडेच नऊ वर्षांखालील खेळाडूंकरिता स्पर्धा सुरू करण्यात आल्यामुळे सहा वर्षांपासूनची मुले-मुली या खेळाकडे येऊ लागली आहेत. या अकादमीतून तयार झालेल्या काही खेळाडूंना विविध उद्योगसंस्थांकडून थोडय़ा फार प्रमाणात आर्थिक मदत मिळू लागली आहे. तीन-चार खेळाडूंना ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, लक्ष्य फाउंडेशन आदी संस्थांनी दत्तकही घेतले आहे.

शालेय व महाविद्यालयीन स्तरावर या खेळाची व्याप्ती वाढावी, या दृष्टीने वासंतिक शिबिरेही या अकादमीतर्फे घेतली जात असतात. त्यामधूनच त्यांना चांगले नैपुण्य मिळत आहे. असे असूनही अकादमीकरिता स्वत:च्या हक्काची जागा मिळत नाही, तोपर्यंत या अकादमीच्या संघटकांवर सतत टांगती तलवार असते. महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी जागा मिळाली, तर या अकादमीतील खेळाडू निश्चितपणे ऑलिम्पिक पदकावर नाव कोरतील.