ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका केल्यानंतर देशातील अनेक माजी खेळाडू आणि लोकप्रिय व्यक्तींनी कोहलीच्या समर्थनार्थ आवाज उठवला. ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी कोहली क्रीडा जगतातील डोनाल्ड ट्रम्प असल्याचे म्हटले आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या प्रकरणात उडी घेऊन ऑस्ट्रेलियन माध्यमांविरोधात जोरदार ‘बॅटिंग’ केली. त्यानंतर आता खुद्द ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कच कोहलीच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. कोहलीची प्रतिमा मलिन करण्याचा ऑस्ट्रेलियातील काही पत्रकारांचा डाव असल्याचा घणाघाती आरोप मायकेल क्लार्कने केला. कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या दोन-तीन पत्रकारांच्या विरोधामुळे अस्वस्थ होण्याची काहीच गरज नाही. अशा लोकांना कोहलीने अजिबात महत्त्व देऊ नये, त्यांच्याकडून फक्त प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घरचा आहेर क्लार्कने ऑस्ट्रेलियन माध्यमांना दिला आहे.

क्लार्कने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी कोहलीवर केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, कोहलीची डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना करणे मुर्खपणा आहे. कोहलीने जे केले, ते स्मिथनेही केले असेल. कोहली माझा आवडता खेळाडू आहे हे लक्षात असू द्या आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहते देखील कोहलीवर प्रेम करतात. कोहली ज्यापद्धतीने खेळतो त्यात एका ऑस्ट्रेलियन खेळाडूचेच रुप दिसून येते. विराटची आव्हानांना सामोरे जाण्याच्या खिलाडू वृत्तीचा मी चाहता आहे. ऑस्ट्रेलियातील दोन-तीन पत्रकार त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. पण विराटने याची अजिबात चिंता करू नये.

 

ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ वृत्तपत्राने कोहलीवर टीका करताना त्याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली होती. ‘रांची कसोटी भारतीय संघ जिंकू शकला नाही. पुणे, बेंगळुरू आणि रांची अशा तिन्ही कसोटीत कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याचे खापर कोहलीने प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. कोहली जागतिक क्रीडा क्षेत्रातील ट्रम्पच झाला आहे’, असे ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने म्हटले होते.

ऑस्ट्रेलियातील माध्यमांच्या वृत्तामुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथलाही वाईट वाटले असेल. तोही माझ्या भूमिकेशी सहमत असेल, असेही क्लार्कने म्हटले. धर्मशाला कसोटीत विजय कसा मिळवता येईल याच गोष्टीकडे दोन्ही कर्णधार लक्ष केंद्रीत करत असतील आणि मैदानाबाहेरील वादांवर त्यांना लक्ष देण्याची गरज नाही. मैदानात खेळाडूंमध्ये खटके उडत असले तरी वैयक्तिक आयुष्यात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. दोन्ही संघातील खेळाडू फक्त विजयासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देत आहेत, याकडे आपण खरंतर लक्ष द्यायला हवं, असेही क्लार्क पुढे म्हणाला.