मायदेशातील मालिका गमावण्याची टांगती तलवार भारतीय संघासमोर आहे. याच भयामुळे पाहुण्या संघातील खेळाडूंविरोधात ते शाब्दिक आक्रमण करीत आहेत, असा शेरा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मारला आहे.

पायाला झालेल्या दुखापतीमुळे मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतलेला स्टार्क म्हणाला, ‘‘पुण्यातील सलामीच्या सामन्यात पत्करलेल्या पराभवामुळे भारतीय संघ खचला आहे. त्यामुळेच ते बचावात्मक रणनीतीचा अवलंब करीत आहे.’’

‘‘ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय खेळाडूंकडूनच मोठय़ा प्रमाणात शाब्दिक आक्रमण केले जात आहे. या मालिकेचे महत्त्व आधीपासूनच वाढले होते. मात्र आम्ही फक्त क्रिकेट खेळण्याकडेच लक्ष केंद्रित करतो,’’ असे स्टार्कने सांगितले.

‘‘भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता पुण्यातील पराभवानंतर त्यांना ऑस्ट्रेलियन संघाची भीती वाटू लागली आहे. त्यानंतर बचावात्मक वृत्ती भारतीय संघात बळावली आहे,’’ असे तो पुढे म्हणाला.

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराटने आपली वर्तणूक सुधारायला हवी. त्याच्या कामगिरीत सातत्य आहे, यात शंकाच नाही. मात्र कर्णधार म्हणून खेळताना जबाबदारी असते. अन्य खेळाडूंच्या तुलनेत कर्णधाराला सामंजस्याने वागायला हवे. बाद झालेल्या फलंदाजाची खिल्ली उडवणे, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आचारसंहितेचा भंग करणारे आहे. मात्र कोहलीला कोणतीही शिक्षा झाली नाही. त्याची भाषाही आक्षेपार्ह अशीच आहे. सध्याच्या घडीला जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याची गणना होते, मात्र कर्णधार म्हणून त्याचे वागणे लौकिकाला साजेसे नाही.  -जेफ लॉसन, ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज

 

धरमशालाची खेळपट्टी भारतीय संघासाठी निराशाजनक -जॉन्सन

नवी दिल्ली : धरमशालाची वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी भारतीय संघाला निराश करील आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियासाठी आशादायी आहे, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने व्यक्त केला आहे.

‘‘धरमशालाचे स्टेडियम अप्रतिम आहे आणि प्रथमच वेगळी खेळपट्टी पाहिली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास वाढला असून, भारतीय संघ थोडा निराश झाला आहे. भारतीय खेळाडूंचा अतिआत्मविश्वास या मालिकेत दिसून आला,’’ असे जॉन्सनने सांगितले.

शनिवारपासून चौथी कसोटी सुरू होणार असून, पुण्यातील कसोटी विजयाचा नायक स्टीव्ह ओ’कीफला विश्रांती देऊन त्याऐवजी वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना जॉन्सनने केली आहे.

‘‘धरमशाला कसोटीत एका फिरकी गोलंदाजाला वगळायला हरकत नाही. संपूर्ण मालिकेत फिरकी गोलंदाजांचे महत्त्व अधोरेखित होते. या फिरकीपटूंना आपले दडपण अप्रतिमरीत्या हाताळले. नॅथन लिऑनकडे चेंडूला उसळी देण्याची आणि वळवण्याची क्षमता आहे. ही खेळपट्टी ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वाटत आहे. त्यामुळे बर्ड या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देता येऊ शकते,’’ असे जॉन्सनने सांगितले.

रांची कसोटीत पीटर हँड्सकोम्ब आणि शॉन मार्श यांनी झुंजार फलंदाजीचे प्रदर्शन करीत कसोटी वाचवली. त्यामुळे पुढील कसोटी सामन्याकडे जाताना ऑस्ट्रेलियाचे मानसिक सामथ्र्य वाढलेले असेल, असे मत जॉन्सनने व्यक्त केले.

‘‘ऑस्ट्रेलियन संघाने जरी तिसरी कसोटी अनिर्णित राखली असली तरी ती संघासाठी अतिशय सकारात्मक गोष्ट ठरली आहे. कारण याआधी अनेकदा आमच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली होती. त्यामुळेच धरमशाला येथे ऑस्ट्रेलियाच्या विजयाबाबत मी आशावादी आहे,’’ असे जॉन्सनने सांगितले.

 

रांचीतील खेळपट्टी सर्वात कठीण -हँड्सकोम्ब

धरमशाला : रांचीतील खेळपट्टीवर तग धरणे सर्वात अवघड होते, अशी प्रांजळ कबुली ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज पीटर हँड्सकोम्बने दिली आहे. हँड्सकोम्ब आणि शॉन मार्श या जोडीनेच रांची कसोटीच्या पाचव्या दिवशी ६२ षटके नांगर टाकत भारताला विजय मिळवू न देता सामना अनिर्णित राखला होता.

‘‘कसोटीच्या पाचव्या दिवशी आणि जगातल्या सर्वोत्तम दोन फिरकीपटूंविरुद्ध खेळणे अत्यंत अवघड होते. मी आणि शॉनने धैर्याने खेळ केला. रवींद्र जडेजाविरुद्ध खेळताना उजव्या यष्टीबाहेर खेळपट्टी निखळली होती. तिथे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पुढे काय होईल सांगणे कठीण होते. त्यामुळे शॉनसाठी काम आणखी कठीण झाले होते. जडेजा अत्यंत वेगाने षटक टाकतो आणि सातत्याने एकाच टप्प्यावर चेंडू टाकतो,’’ असे हँड्सकोम्बने सांगितले.

‘‘आम्ही एकमेकांशी फार काही बोललो नाही. फिरकीपटूंचा कसा सामना करायचा याची माझी आणि शॉनची पद्धत वेगळी होती. षटकांदरम्यान आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. सामना अनिर्णित राखू शकतो असा विश्वास होता. मात्र त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल याची जाणीव होती. संघासाठी सामना अनिर्णित राखू शकलो याचे अत्यंत समाधान आहे,’’ असे हँड्सकोम्बने स्पष्ट केले.