महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व आता विराट कोहलीकडे आलं आहे. विराटनेही अल्पावधीतचं कर्णधार म्हणून भारतीय संघावर आपली पकड बसवली आहे. खेळाडूंना संधी देण्यापासून ते खडतर परिस्थितीत संघाचं सक्षम नेतृत्व करण्याचं काम विराट कोहली चोखपणे बजावतो आहे. विराट कोहलीच्या या गुणांचे मोहम्मद शमीने कौतुक केले आहे. विराटमुळे ड्रेसिंग रुममध्ये वातावरण हे अगदी खेळकर असतं, याचमुळे भारतीय संघ मैदानात चांगली कामगिरी बजावत असल्याचं शमीने म्हटलंय.

“इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शमीने विराटचे कौतुक केले. भारतीय संघात प्रत्येक खेळाडू इतर खेळाडूच्या आनंदात सहभागी होतो. एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली अथवा एखादा विक्रम केला तर सर्वजणांना आनंद होतो. हे खेळकर वातावरण तयार करण्यात विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. याचमुळे माझ्या कामगिरीतही सुधारणा झाल्याचं, मोहम्मद शमीने नमूद केलंय.”

कर्णधार म्हणून विराट कोहली संघात आता महत्वाची भूमिका बजावतो आहे. एखाद्या खेळाडूच्या पडत्या काळात कोहली त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. यामुळे त्या खेळाडूच्या कामगिरीतही सुधारणा होते. कोहलीच्या कर्णधारपदी येण्यामुळे प्रत्येक खेळाडूत एक आत्मविश्वास आला आहे, याचाच फायदा मैदानावर खेळताना होत असल्याचंही शमी म्हणाला.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत शमीला संघात स्थान मिळालेलं नाहीये. मात्र, यानंतर न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात मोहम्मद शमी आणि पर्यायाने भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.