श्रेयस अय्यरच्या मोसमात हजार धावा पूर्ण
समर काद्रीच्या पाच बळींच्या जोरावर झारखंडने मुंबईचा दुसरा डाव २४५ धावांत गुंडाळला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने झारखंडसमोर विजयासाठी ४९० धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना झारखंडची स्थिती १ बाद २८ अशी आहे. मुंबईच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी साकारणारा श्रेयस अय्यर यंदाच्या रणजी हंगामात हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.
तत्पूर्वी ८ बाद १५० वरून पुढे खेळणाऱ्या झारखंडचा पहिला डाव १७२ धावांत आटोपला. कौशल सिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. मुंबईतर्फे अखिल हेरवाडकर, इक्बाल अब्दुल्ला आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. मुंबईला २४४ धावांची मोठी आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात मुंबईची झारखंडच्या भेदक माऱ्यासमोर घसरगुंडी उडाली. पहिल्या डावातील शतकवीर अखिल हेरवाडकर १५ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यरने ९ चौकार आणि २ षटकारांसह ८१ धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीच्या बळावरच मुंबईने २४५ धावा केल्या. झारखंडतर्फे समर काद्रीने ६२ धावांत ५ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४१६ आणि २४५ (श्रेयस अय्यर ८१, समर काद्री ५/६२) विरुद्ध झारखंड : १७२ आणि १ बाद २८.
विदर्भचे आव्हान संपुष्टात
विझीनगरम : जयदेव उनाडकटच्या सामन्यातील ९ बळींच्या जोरावर सौराष्ट्रने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या लढतीत विदर्भवर डावाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. या पराभवासह विदर्भाचे आव्हान संपुष्टात आले आहे. बिनबाद १७ वरून पुढे खेळणाऱ्या विदर्भचा दुसरा डाव १३९ धावांतच संपुष्टात आला.
पाटीदारचे शतक
मुंबई : रजत पाटीदारच्या दमदार १३७ धावांच्या खेळीच्या बळावर मध्य प्रदेशने बंगालविरुद्धच्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशच्या ५ बाद ३३८ धावा झाल्या आहेत.