भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील जमैका येथी दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज मुरली विजयऐवजी लोकेश राहुल याला संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शनन गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर मुरली जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याची दुखापत बळावल्याने तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. गोलंदाजीसाठी नंदनवन असणाऱ्या सबीना पार्क मैदानावर भारतीय संघातील सयंमी सलामीवीराची कमी भरुन काढण्याची जबाबदारी राहुल लोकेशवर असेल. शिखर धवनसोबत लोकेश भारताच्या डावाला आकार देण्याची महत्त्वपुर्ण भूमिका साकारावी लागेल. आतापर्यंत लोकेश राहुलने भारताकडून पाच कसोटी सामने खेळले असून  २५.६ च्या सरासरीने त्याने २५६ धावा जमविल्या आहेत. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सिडनीच्या मैदानावर लोकेशने कसोटी कारकिर्दीतील ११० धावांची सर्वोच्च खेळी साकारली होती. दुखापतग्रस्त विजय मुरली याने भारताकडून ३८ कसोटी सामने खेळले असून ४६.५६ च्या सरासरीने २६३७ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल याच्यावर मुरली विजयच्या अनुभवाची उणीव भरुन काढण्याचे दडपण देखील असेल. वेस्ट इंडिजसोबतचा पहिला कसोटी सामना जिंकून चार कसोटी सामन्यांच्या  मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी मिळवली आहे.