सध्याच्या परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेचे आयोजन करता येणार नसल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा सुरू राहील तोपर्यंत क्रिकेट सामने होऊ शकणार नाही, असे त्यांनी म्हटले. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळादरम्यान दुबई येथे होणाऱ्या बैठकीवरून गोयल यांनी केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट केले. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार असून यामध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धींमध्ये सामना होणार आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने या दोन्ही देशातील क्रिकेट संबंधाबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केले.

गोयल म्हणाले, बीसीसीआयने सरकारशी चर्चा केल्यानंतरच प्रस्ताव दिला पाहिजे. दहशतवाद आणि खेळ एकत्र चालू शकत नाही. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान दरम्यान राजकीय संबंधात वितुष्ट आल्यामुळे द्विपक्षीय क्रिकेट मालिकेचे आयोजनही करण्यात आलेले नाही.

दरम्यान, दोन्ही संघ येत्या रविवारी एजबस्टन येथे आमने-सामने येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकाही याच गटात आहेत. चारही संघ मजबूत असल्यामुळे हा गट कठीण असल्याचे बोलले जात आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.