भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बेशिस्त वर्तन करणाऱ्या पाकिस्तानच्या दोन हॉकीपटूंवर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे अमजद अली आणि मोहम्मद तौसिक यांना चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकावे लागणार आहे.
एफआयएचने असभ्य वर्तन करणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंवर कारवाई केली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनावर बहिष्कार घालू, असा इशारा हॉकी इंडियाने दिल्यानंतर लगेच पावले उचलण्यात आली. भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात ३-४ असा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी टी-शर्ट उंचावून आनंद व्यक्त केला; पण त्यापैकी काहींनी शिवीगाळ करून चाहते आणि प्रसारमाध्यमांच्या दिशेने मधले बोट दाखवून गैरवर्तणूक केली. त्यामुळे अमजद आणि तौसिक यांना एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले, तर शाफकत रसूल याला अधिकृत ताकीद देण्यात आली. अमजद आणि तौसिक यांनी आपली चूक मान्य केली आहे.
‘‘सामना जिंकल्यानंतर अमजद अलीने मधले बोट दाखवून बेशिस्त वर्तन केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. एफआयएचच्या नियमांनुसार हा गंभीर गुन्हा मानला जातो. अमजदसह पाकिस्तानने हॉकी चाहत्यांची लेखी माफी मागितली आहे. अमजद आणि तौसिक यांना एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले असून त्यांना पुढील सामन्यात खेळता येणार नाही,’’ असे एफआयएचच्या पत्रकात म्हटले आहे. पाकिस्तान आणि जर्मनी यांच्यात रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी कलिंगा स्टेडियमवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
स्पर्धा संचालक वायर्ट डॉयर यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी जाऊन चर्चा केली. खेळाडूंनी माफी मागितल्याने एफआयएच समाधानी असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची गरज नसल्याचे डॉयर यांनी सांगितले होते.
दरम्यान, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक शाहनाझ शेख यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करताना हॉकी चाहत्यांची माफी मागितली होती. ‘‘संपूर्ण हॉकी क्षेत्राला आणि पाकिस्तान हॉकी महासंघाला या प्रकाराचा खेद वाटत आहे. भारत या स्पर्धेचे संयोजक असल्यामुळे आपण त्यांचे पाहुणे आहोत, असे मी खेळाडूंना समजावून सांगितले आहे. पाकिस्तानच्या काही खेळाडूंचे हे कृत्य मला अमान्य आहे,’’ असे शेख म्हणाले.

जर्मनीला जेतेपद; भारताला चौथे स्थान
ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीने अंतिम फेरीत पाकिस्तानवर २-० असा विजय मिळवत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारताला ऑस्ट्रेलियाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चॅम्पियन्स स्पर्धेचे जर्मनीचे हे १०वे जेतेपद ठरले. जर्मनीने पाकिस्तानपेक्षा जास्त वेळ चेंडूवर ताबा मिळवत सामन्यावर वर्चस्व गाजवले. ख्रिस्तोफर वेसले (१८व्या मिनिटाला) आणि फ्लोरियन फचस (५७व्या मिनिटाला) यांनी गोल करत जर्मनीला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
कलिंगा स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अनेक वेळा गोल करण्यात अपयश आले. अन्यथा, या स्पर्धेत १९८२नंतर पहिल्यांदाच भारताला कांस्यपदक पटकावता आले असते. ऑस्ट्रेलियाकडून ईडी ओकेनडेन (१८व्या मिनिटाला) आणि मॅट गोहडेस (५२व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताकडून ललित उपाध्यायने (४२व्या मिनिटाला) गोल करत कडवी झुंज दिली.