भारताची नेमबाज पूजा घाटकर हिने नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये १० मी एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. ऐनवेळी आलेल्या तांत्रिक अडचणीवर मात करूनही पूजाने आत्मविश्वास कायम ठेवून कांस्य पदकावर नाव कोरले. २८ वर्षीय पूजा घाटकरने १० मी एअर रायफलमध्ये सुरूवातीपासून चांगली कामगिरी केली.

 

ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेल्या गगन नारंगच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱया पुजाने स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत २२८.८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. तर चीनच्या मेन्ग्यो शी हिने २५२.१ गुणांसह नव्या विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली. पुजा घाटकर हिला डोंग लिजे हिने तोडीस तोड लढत दिली. मात्र अखेरच्या क्षणी अचूक नेमबाजी करीत लिजे हिने २४८.९ गुणांपर्यंत मजल मारली. आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केलेल्या पूजा घाटकर हिचे वर्ल्डकप स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले आहे. पूजाला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अवघ्या काही गुणांच्या फरकामुळे मुकावे लागले होते. त्यानंतर पूजाने अविरत मेहनत आणि सरावाच्या जोरावर कामगिरीत सुधारणा करत वर्ल्डकपमध्ये मजल मारली. घाटकरने अंतिम फेरीत १९ व्या प्रयत्नात १०.८ आणि २१ व्या प्रयत्नात १०.७ असा अचूक लक्ष्यवेध करत कांस्य पदकावर शिक्कामोर्तब केले.