आंध्र प्रदेशविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात मुंबईची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. मात्र घरच्या मैदानावर पंजाबविरुद्ध मुंबईचा संघ कडवी लढत देऊनजिंकेल, असा विश्वास मुंबईचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी व्यक्त केली. वानखेडे स्टेडियमवर ८ ऑक्टोबरपासून ‘ब’ गटातील मुंबईच्या दुसऱ्या रणजी सामन्याला प्रारंभ होत आहे.

‘‘पहिल्या लढतीतून धडा घेत कामगिरी उंचावण्याचा आमचा प्रयत्न असेल. हंगाम आता सुरू झाला आहे, अजून बरेच सामने खेळायचे आहेत. खेळाडूंना पहिल्या सामन्यातून आपल्या कामगिरीची जाणीव झाली आहे,’’ असे पंडित यांनी सांगितले.

विजयानगरम्ला झालेल्या आंध्र  प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात काय चुकीचे घडले, याविषयी सराव सत्रात खेळाडूंशी चर्चा केली आहे, असे मुंबईचे माजी यष्टीरक्षक पंडित यांनी सांगितले.

‘‘मी काही खेळाडूंशी वैयक्तिक चर्चा करून त्यांना काही गोष्टींची जाणीव करून दिली आहे. ते दुसऱ्या रणजी सामन्यात दृष्टिकोन बदलून मैदानावर उतरतील. मुंबई क्रिकेटची झुंजार वृत्ती मैदानावर दिसेल,’’ असा विश्वास पंडित यांनी व्यक्त केला.