ही घटना दोन महिन्यांपूर्वीची, जून महिन्यातली. ऑस्ट्रेलियन सुपरसीरिज स्पर्धेत तिला पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पहिल्याच दिवशी आव्हान संपुष्टात आल्याने पुढचे दिवस भारतीय खेळाडूंच्या सामन्यांची ती प्रेक्षक झाली. योगायोगाने सायना नेहवालने जेतेपद पटकावले. पुढच्याच दिवशी भारतीय चमू मायदेशी परतला. जेतेपद पटकावून परतल्याने सायना कॅमेऱ्यांच्या लेन्सचा केंद्रबिंदू होती. प्रदीर्घ कालावधीनंतर जेतेपद मिळवल्याने या अनुभवाविषयी सायनाकडून जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उत्सुक होते. जेतेपदांच्या पथावर परतल्याने सायनाचे प्रायोजकही खूश होते आणि यानिमित्ताने त्यांनी अनेक कार्यक्रम आखले होते. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली, मात्र फारशा फॉर्मात नसलेली, दुखापतीतून सावरलेली, पण पहिल्याच फेरीत हरलेली सिंधू दुर्लक्षितच राहिली.

दोन महिन्यांनंतरचं चित्र. ‘सिंधू हमारी शान’, ‘रजतसिंधू’, ‘सिंधू, तुझा अभिमान वाटतो’ अशा आशयाचे फलक हैदराबाद विमानतळाच्या बाहेर विहरत होते. भारतीय बॅडमिंटन संघटना, आंध्र आणि तेलंगण बॅडमिंटन संघटना, गोपीचंद अकादमीतील कर्मचारीवृंद यांच्यासह आंध्र प्रदेश आणि तेलंगण सरकारमधील मंत्रिगण आणि कर्मचाऱ्यांचा ताफा विमानतळावर हजर होता. २१व्या वर्षी देशासाठी पदक जिंकून देणाऱ्या सिंधूला याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी ढोल, नगारे, बिगूल, हारतुरे, पेढे, लाडू घेऊन बॅडमिंटन चाहते उपस्थित होते. काही मिनिटांतच ती येणार असल्याची घोषणा झाली. प्रशिक्षक गोपीचंद यांच्याबरोबरीने ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू अवतरली आणि जल्लोशाला उधाण आले. सिंधूच्या नावाचा जयघोष झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला. हस्तांदोलन, शुभेच्छा आणि हारतुरे देण्याची लगबग उडाली. शिष्टाचारी सोपस्कार झाल्यावर पदकासह सिंधूची प्रसन्न छबी टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा लखलखाट सुरू झाला. प्रदीर्घ विमानप्रवासाच्या जेटलॅगमुळे चेहऱ्यावर थकवा बाजूला सारून हसऱ्या चेहऱ्यानिशी सामोरं जाणं तिला भाग होतं. डावीकडे, उजवीकडे, थेट समोर अशा दिशेने पदकासह भावमुद्रा देण्यात अर्धा तास गेला. हे आटोपतोय तोच बेस्टची नीलांबरी बस तिची वाट पाहत होती. बस हलली. नावाचा पुकार करणाऱ्या, आपल्या स्वागतासाठी खूप वेळ उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिनं अभिवादन केलं. दोन महिन्यांपूर्वी ती याच रस्त्यावरून घरी जाताना कोणाला कळलंही नाही आणि या वेळी अख्खं हैदराबाद स्वागताला लोटलं होतं. आपलं जग किती बदललंय याची पहिली स्पष्ट जाणीव सिंधूला झाली. मिरवणूक आणि नंतर जंगी सत्कार होऊन घरी जायला तीन-चार तास लागले. एरव्ही तासाभरात हे अंतर पार होतं. आता आपलं मुक्तपण संपलं याचीही तिला कल्पना आली. घरी प्रसारमाध्यमांचा जथा तयारच होता. प्रत्येकाची प्रश्नांची सरबत्ती संपायला दोन तास गेले. त्यानंतर कर्मभूमीत अर्थात गोपीचंद अकादमीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रोज बाजूच्या कोर्टवर सराव करणाऱ्या मुलीनं ऑलिम्पिक पदक आणलंय ही अभिमानास्पद भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती. कॅरोलिन मारिनला टक्कर देण्याइतकंच दिवसभर केवळ शुभेच्छा स्वीकारणंही किती कठीण आहे याचा प्रत्यय सिंधूला आला. मध्यरात्रीच्या सुमारास सिंधूचा दिवस संपला.

नकोशी आता हवीशी!

ऑलिम्पिकपूर्वी सिंधूचे व्यवस्थापन करणाऱ्या चमूने असंख्य कंपन्यांना जाहिरातींसंदर्भात विचारणा केली. मात्र ब्रँड सिंधू फार तर आठवडाभर टिकेल, नंतर काय, असं सांगत बहुतांशी जणांनी प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मात्र ऑलिम्पिक पदकाने चित्रच पालटलं आहे. संयम, चिवटपणे झुंज देण्याची तयारी, आत्मविश्वास, तंदुरुस्ती, खेळभावना ही सिंधूची गुणवैशिष्टय़े आपल्या उत्पादनाचेही वैशिष्टय़ असल्याचे दाखवत ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या आखल्या जात आहेत. घर-बंगल्यांच्या योजनांपासून ऊर्जापेयांपर्यंत अशा विविधांगी जाहिरातदारांची सिंधूकडे रीघ लागली आहे. ब्रँड सिंधू जोरात असल्याने प्रत्येक जाहिरातीसाठी सिंधूला ७० ते ७५ लाख रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रँडशी करारबद्ध झाल्यावर त्यांच्या अटींची वेसणही घट्ट होते. प्रत्येक ब्रँडसाठी वर्षांतून किमान पाच ते सहा दिवस जाहिराती, कार्यक्रम यांच्यासाठी द्यावे लागतात. जितके अधिक ब्रँड तेवढे अधिक दिवस. त्यामुळे भरगच्च आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, प्रीमिअर बॅडमिंटन लीग, प्रवास या व्यस्त वेळापत्रकातून सिंधूला प्रायोजकांसाठी वेळ द्यावा लागेल. पायाच्या दुखापतीमुळे सिंधू यंदाच्या हंगामात सहा महिने कोर्टपासून दूर होती. मात्र आता प्रायोजकांच्या दबावापुढे तिला एवढी विश्रांती घेता येईल का याबाबत शंकाच आहे.

ब्रँड सायनाला पर्याय आणि आव्हान

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह सायनाचे क्षितिज व्यापले. जाहिरातींच्या करारांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. लंडन ते रिओ या कालावधीत सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र तिच्या जेतेपदांची संख्या कमी झाली आहे. दुखापतींनी वेढल्यामुळे तिच्या खेळावरही परिणाम झाला आहे. सिंधूने सायनाच्या पदकाचा रंग बदलत एक पाऊल पुढे टाकले आहे. भारतीय बॅडमिंटनचा चेहरा म्हणजे सायना नेहवाल असे समीकरण होते. मात्र आता सिंधूच्या रूपात जाहिरात कंपन्यांना थेट पर्याय उपलब्ध झाला आहे. २१ वर्षीय सिंधू किमान आठ वर्षे खेळेल हे नक्की असल्याने जाहिरातदारांचा तिच्याकडे ओढा जास्त आहे. ऑलिम्पिक पदकाने सायना वलयांकित झाली. तिचं प्रत्येक मिनिट आणि सेकंद आरक्षित असतं. रॅम्पवॉकपासून जनहितार्थ जाहिरातींमध्ये ती दिसते. तिचं ट्वीट आणि फेसबुक अकाऊंट सांभाळायला वेगळी माणसं आहेत. एखाद्या प्रश्नावर भूमिका घेणं ब्रँडसाठी अडचणीचं ठरू शकत असल्यानं कायमच शिष्टाचारी वागावं लागतं. कंपन्या एवढा पैसा खर्च करत असल्याने सातत्याने सायनावर जिंकण्याचं दडपण असतं. ऑलिम्पिक पदकासह हे सगळं सिंधूकडे संक्रमित झालं आहे. प्रशिक्षक गोपीचंद यांच्या लष्करी खाक्यासदृश वातावरणातून सिंधूने ऑलिम्पिक पदकापर्यंत वाटचाल केली आहे. मात्र आता आव्हान सार्वजनिक झालं आहे. खेळ आणि खेळापल्याडचं विश्व सांभाळण्याची कसरत सिंधूला करावी लागणार आहे.

 

– पराग फाटक

parag.phatak@expressindia.com