मुंबई आणि सेनादल यांच्यात पालम येथे सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याला पावसाचा फटका बसला. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी दुपापर्यंत जोरदार ‘बॅटिंग’ केली. त्यामुळे अखेर पंचांना सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला. दोन्ही संघ सामना सुरू होण्याची वाट पाहत होते. पण दुपारी पंच एड्रियन होल्डस्टोक आणि सुब्रत दास यांनी खेळपट्टीचे निरीक्षण केल्यानंतर खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे स्टेडियमवरील दोन साइडस्क्रिन खराब झाल्या.
तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची ६ बाद ३८० अशी स्थिती असून आदित्य तरे (१०८) आणि कर्णधार अजित आगरकर (११३) खेळत आहेत. पाच दिवसांच्या या सामन्यात दोन्ही संघांचा पहिला डाव पूर्ण होऊ न शकल्यास, राखीव म्हणून ठेवलेल्या सहाव्या दिवशी खेळ सुरू ठेवण्यात येईल. सहाव्या दिवशीही पहिला डाव पूर्ण न झाल्यास, नाणेफेक करून विजेता ठरवण्यात येईल, अशी तरतूद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांत आहे.
मोठय़ा आघाडीच्या दिशेने सौराष्ट्रची वाटचाल
राजकोट : ऑफस्पिनर विशाल जोशी आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्रने पंजाबला रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ९ बाद २९४ धावांवर रोखले आहे.