मेयोरल, बेल यांचे निर्णायक गोल; रिअल सोसिएदादवर मात

गॅरेथ बेलने टीकाकारांना आपल्या शैलीत सडेतोड उत्तर देताना रिअल माद्रिद क्लबला ला लिगा फुटबॉल स्पध्रेत पराभवाच्या मालिकेतून विजयपथावर आणले. बेल आणि बोर्जा मेयोरल यांच्या प्रत्येकी एक, तर केव्हिन रॉड्रिगेसच्या स्वयंगोलमुळे रिअल माद्रिदने सोमवारी रिअल सोसिएदाद क्लबवर ३-१ असा विजय मिळवला. बोर्जाचा रिअलसाठी हा पहिलाच गोल ठरला. या विजयाबरोबर गतविजेत्या माद्रिदने चौथ्यास्थानी आगेकूच केली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत बेलने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार न पाडल्याने स्पेनमधील माध्यम आणि माद्रिदच्या चाहत्यांनी त्याच्यावर सडेतोड टीका केली. त्याच्या ढिसाळ खेळामुळे माद्रिदला व्हॅलेंसिया आणि लेव्हांटेविरुद्ध संपूर्ण तीन गुणांनी कमाई करण्यात अपयश आले. त्यामुळे गतविजेत्यांची गुणतालिकेत घसरण झाली. याही लढतीत रोनाल्डो आणि दुखापतग्रस्त करीम बेंझेमा यांच्याशिवाय माद्रिदला खेळ करावा लागला. त्यामुळे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी २० वर्षीय मेयोरलला संधी दिली.

‘‘गोल करण्यापेक्षा क्लबला तीन गुणांची कमाई करून देण्याचा आनंद अधिक आहे. आता क्लब विजयपथावर परतला आहे. टीकाकारांकडे लक्ष न देता अधिक मेहनत घेण्यावर मी भर दिला आणि तेच माझ्या हातात आहे. लोकांच्या बोलण्यावर मी अंकुश लावू शकत नाही. मैदानावर शंभर टक्के खेळ करणे माझ्या हातात आहे. कारकीर्दीत चढ-उतार येतात, पण त्यातून पुनरागमन करणे महत्त्वाचे असते,’’ असे मत बेलने सामन्यानंतर व्यक्त केले.

झिदान यांनी दाखवलेल्या विश्वासावर मेयोरल खरा उतरला. १९व्या मिनिटाला त्याने गोल करून माद्रिदचे खाते उघडले. मात्र, अवघ्या नऊ मिनिटांत सोसिएदादच्या केव्हिन रॉड्रिगेजने माद्रिदचा गोलरक्षक केयलर नव्हासला चकवून बरोबरीचा गोल केला. अलव्हारो ओड्रिओझोलाच्या क्रॉसवर रॉड्रिगेजने अप्रतिम व्हॉलीद्वारे गोल केला. या गोलने सामन्यात रंजकता निर्माण केली, परंतु रॉड्रिगेजनेच पुन्हा माद्रिदचे पारडे जड केले. ३६व्या मिनिटाला रॉड्रिगेजच्या स्वयंगोलने माद्रिदने २-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात दोन्ही क्लबकडून जोरदार प्रयत्न झाले आणि यावेळी माद्रिदला यश आले. बेलने ६१व्या मिनिटाला केलेला गोल माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरेसा ठरला.

७३

रिअल माद्रिदने सर्व प्रकारच्या स्पर्धामधील सलग ७३ सामन्यांत गोल करण्याचा विक्रम सोमवारी नोंदवला. मेयोरलच्या गोलने माद्रिदला सँटोस क्लबने नोंदवलेल्या विश्वविक्रमाची बरोबरी करून दिली. सँटोस क्लबने १९६१ ते ६३ या कालावधीत सलग ७३ सामन्यांत गोल केले होते.

११

माद्रिदने ला लिगा स्पध्रेतील प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सलग ११ विजयांची नोंद केली. या स्पध्रेतील त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

०१

ला लिगा स्पध्रेतील एकाच लढतीत गोल आणि स्वयंगोल करणारा केव्हीन रॉड्रिगेज हा पहिलाच खेळाडू आहे.