भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानी या खेळाडूचा २१-१५, २१-१४ ने पराभव केला.

बॅडमिंटनमध्ये माजी अव्वल मानांकित सायनाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत आपलं कौशल्य पुन्हा सिध्द केलंय. लंडन आॅलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळवलेल्या सायनाला रिओ आॅलिंपिकमध्ये  पराभव पत्करावा लागला होता आणि भारताच्या पी व्ही सिंधूने आॅलिंपिकच्या फायनलमध्ये धडक मारत सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. यानंतर सायना संपली अशी ओरड सगळ्यांकडून करण्यात आली. कोणालाही एका क्षणात डोक्यावर घेणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणी त्याचा रागराग करणाऱ्या भारतीय फॅन्सनी सायनावर ट्विटरच्या माध्यमातून बरीच गरळ ओकली होती. आता सिंधूच भारताची नवी चँप आहे आणि सायनाची सद्दी संपली असे ट्वीट्स या ‘फॅन्स’नी सायनाला टॅग करत केले होते. गुडघ्याच्या दुखापतीशी सामना करणाऱ्या सायनाने ही सगळी टीका कमालीच्या शांतपणे सहन केली. आणि या दुखापतीतून सावरत मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक मारत आपल्या खेळाचा जागतिक पातळीवरचा सरस दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

क्वार्टर फायनलमध्ये सुरूवातीला सायना पिछाडीवर होती. सायनापेक्षा काही वर्षं लहान असणाऱ्या फित्रियानीपुढे दुखापतग्रस्त सायनाचा कसा निभाव लागेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पहिल्या गेममध्ये सायना ६-११ ने पिछाडीवर होती पण आपल्या खेळ उंचावत तिने ही पिछाडी भरून काढली आणि पुढे सहा पाॅईंटस् च्या फरकाने २१-१५ ने पहिला गेम जिंकला.

मॅचमधली ही आपली आगेकूच सायनाने दुसऱ्या गेममध्ये कायम ठेवली आणि यावेळी ११-६ ने आघाडी घेतली. आपल्या आघाडीचा योग्य फायदा उठवत सायनाने दुसरा गेम २१-१४ ने जिंकत मॅच खिशात टाकली. सेमीफायनलमध्ये सायनाची गाठ हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्याशी पडणार आहे. या खेळाडूचा सायनाशी याआधी ८ वेळा सामना झाला आहे आणि त्यात ६ वेळा सायनाने विजय मिळवलेला असल्याने सायनाचं पारडं जड आहे.

पुरूष एकेरीमध्ये मात्र भारताच्या अजय जयरामचा पराभव झाला. क्वार्टर फायनलमध्ये इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंगने जयरामचा २१-१३, २१-८ असा पराभव केला. २८ मिनिटं चाललेल्या या मॅचमध्ये १९ व्या सीडेड जयरामचं आव्हान संपुष्टात आलं. या खेळाडूविरूध्द जयरामचा झालेला हा तिसरा पराभव आहे.