भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचा ताज शिरपेचात खोवून मलेशियात दाखल झालेल्या सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांच्यासह एच. एस. प्रणॉय, पारुपल्ली कश्यप यांनी मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सायना व प्रणॉयने प्रतिस्पर्धी खेळाडूला सहज पराभूत केले, परंतु श्रीकांत आणि कश्यपला पहिल्याच फेरीत विजयासाठी झगडावे लागल़े 

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झालेल्या सायनाने इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमास्तुतीवर ३७ मिनिटांत २१-१३, २१-१६ असा विजय साजरा करून आगेकूच केली. पहिल्या गेमपासून सायनाने आक्रमक खेळावर भर दिला. प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीच संधी न देता तिने १२-४ अशी भक्कम आघाडी घेतली, परंतु मारियाने पुनरागमन करत गेम १९-१३ असा आणला. सायनाने सलग दोन गुण जिंकून पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये मारियाने सुरुवातीला ४-२ अशी आघाडी घेतली खरी, परंतु सायनाने मुसंडी मारत १०-६ आघाडी घेतली. त्यानंतर हा गेम १०-१०, १५-१५ असा बरोबरीत राहिल्याने प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली़ मात्र, जबरदस्त फॉर्मात असलेल्या सायनाने हाही गेम जिंकून बाजी मारली.
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या आणि अव्वल स्थानाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळणाऱ्या श्रीकांतने इंग्लंडच्या राजीव क्युसेफवर २१-१०, १५-२१, २४-२२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात कश्यपने कोरियाच्या ली डाँग केउनवर २१-१५, ११-२१, २१-१४ असा विजय मिळवला. एच. एस. प्रणॉयने आर्यलडच्या स्कॉट इवान्सचा अवघ्या ४१ मिनिटांत २२-२०, २१-१८ असा पराभव करून आगेकूच केली. मिश्र दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. अँग्गा प्रतमा व रिकी करांडा सुवार्डी या इंडोनेशियन जोडीने भारतीय जोडीवर २१-११, २१-१७ असा विजय मिळवला. अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गट्टा या जोडीने केश्या हनाडीआ व देवी टिका पर्मातासारी या इंडोनेशियन जोडीवर २१-१४, १८-२१, २१-१६ असा विजय मिळवला.