भारताचे आशास्थान असलेल्या सायना नेहवाल व कदम्बी श्रीकांत यांनी जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. साखळी गटातील पहिल्या लढतीत सायनाने चीनच्या वाँग शियानवर २१-१७, २१-१८ अशी मात केली.  तर श्रीकांतने पहिला गेम गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत जपानच्या केन्तो मोमोताला पराभूत केले. हा सामना त्याने १५-२१, २१-१६, २१-१० असा जिंकला.
श्रीकांत व केन्तो यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने सुरुवातीला केन्तोला चांगली झुंज दिली. मात्र १२-१० अशा आघाडीनंतर केन्तोने खेळावर नियंत्रण ठेवत हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने जिद्दीने खेळ केला. ८-९ अशा पिछाडीवरून त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग केला व आघाडी मिळवत गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये ५-६ अशा पिछाडीवरून त्याने आक्रमक खेळ करीत सामन्याला कलाटणी दिली.
सायना व वाँग यांच्यातील सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये गुण मिळवण्यासाठी चुरस दिसून आली. सायनाने ८-१० अशा पिछाडीवरून स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ करीत सलग दहा गुण घेत १८-१० अशी आघाडी मिळविली व २५ मिनिटांत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये १-२ अशा पिछाडीवरून वाँगने ८-४ अशी आघाडी मिळवली. मात्र सायनाने जिद्द न सोडता दुसऱ्या गेमसह सामनाही जिंकला.