कुस्तीपटू साक्षी मलिकचा टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाचा निर्धार

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत भारताला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिकला दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमार याचा विक्रम खुणावत आहे. सुशीलप्रमाणे दोन ऑलिम्पिक पदके नावावर करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उतरणार असल्याचा निर्धार तिने बोलून दाखवला.

ती म्हणाली, ‘‘२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून सुशील कुमारच्या ऐतिहासिक कामगिरीची बरोबरी करण्याचे माझे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. सुशीलप्रमाणे मलाही दोन ऑलिम्पिकपदक विजेती व्हायचे आहे.’’

[jwplayer ZFs6PXoZ]

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत पदक जिंकणारी साक्षी ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे आणि हे यश आयुष्याला कलाटणी देणारे ठरल्याचे २४ वर्षीय साक्षी सांगते. ‘‘आयुष्यात चांगले बदल झाले आहेत. लोक मला ओळखू लागले आहेत आणि ही भावना समाधानकारक आहे. यातून मला प्रेरणाही मिळते,’’ असे साक्षी म्हणाली.

या वर्षी होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय मी ठेवले आहे. तसेच मे महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत सहभाग घेण्याचा विचार करत आहे. त्यापलिकडे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदक मला खुणावत आहे, असे साक्षी म्हणाली.

[jwplayer siBod4cy]