गतविजेती पी. व्ही. सिंधू हिच्याबरोबरच एच. एस. प्रणॉय आणि बी. साईप्रणीत यांनी मकाऊ ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत आगेकूच केली आहे.
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने चायनीज तैपेईची खेळाडू हुआंग शिहान हिच्यावर २१-१९, २१-१५ अशी मात केली. या स्पध्रेत दुसरे मानांकन मिळालेल्या सिंधूने २०११मध्ये शिहानला रोमहर्षक लढतीत हरवले होते. यावेळीही तिला विजय मिळविताना चिवट लढत द्यावी लागली. सिंधूला पुढच्या फेरीत गुरुवारी इंडोनेशियाच्या लिंदावेनी फानेत्री हिच्याशी खेळावे लागणार आहे.
तिसऱ्या मानांकित प्रणॉयने इंडोनेशियाच्या आंद्रे मार्टिनचा २१-१८, २१-१६ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. प्रणॉयने यंदा इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. प्रणॉयला पुढच्या फेरीत तैपेईच्या लिन युई हिसेनशी खेळावे लागणार आहे. आठव्या मानांकित साईप्रणीतने सिंगापूरच्या रोनाल्ड सुसिलो याच्याविरुद्ध २१-१५, २१-१८ असा विजय मिळविला. हा सामना त्याने ३० मिनिटांत जिंकला. त्याच्यापुढे इंडोनेशियाच्या सोनी दुई कुंकोरो याचे आव्हान असेल.
भारताच्या पी. सी. तुलसीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. तिला तैपेईची खेळाडू हिसुया चिआंगने २१-१२, २१-१७ असे हरवले. हा सामना चिआंगने ३४ मिनिटांत जिंकला.