भारतीय खेळाडू व परदेशी प्रशिक्षक यांच्यात फार वेळ सुसंवाद टिकत नाही. रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या वेळी भारताची मॅरेथॉनपटू ओ. पी. जैशा हिला शर्यतीच्या वेळी आवश्यक पेये न मिळाल्यामुळे तिला अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. एवढेच नव्हे तर शर्यत पूर्ण केल्यानंतर तिला ग्लानी आली व रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. या घटनेस जैशाचे परदेशी प्रशिक्षक निकोलाय स्नेसारेव्ह यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

क्रीडा मंत्रालयाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने संबंधित संघटकांशी चर्चा करून निकोलाय यांच्यावर जैशाच्या पराभवाचे खापर फोडले आहे. परदेशी प्रशिक्षक जेव्हा नकोसा होतो, तेव्हा त्याच्याबाबत काही प्रकरणे बाहेर काढून त्याला नामोहरम करण्याची सवयच आपल्या क्रीडा संघटकांना लागली आहे. जोपर्यंत परदेशी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडू चांगले यश मिळवीत असतात, त्या वेळी या प्रशिक्षकांचा उदो उदो केला जातो. मात्र खेळाडूंची कामगिरी खराब होऊ लागली की परदेशी प्रशिक्षकाला खडय़ासारखे बाहेर फेकले जाते. हॉकी, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स आदी अनेक खेळांबाबत असा अनुभव पाहावयास मिळाला आहे. हॉकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांत भारतीय संघाने पंधराहून अधिक प्रशिक्षकांचा अनुभव घेतला असेल.

ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या व महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये कोणताही खेळाडू भाग घेतो, तेव्हा त्याने या स्पर्धेच्या नियमांबाबत सखोल अभ्यास करणे अपेक्षित असते. जैशा ही जरी ऑलिम्पिकसाठी नवीन असली, तरी तिने या स्पर्धेपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक स्पर्धा, आशियाई इनडोअर स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. त्यामुळेच ऑलिम्पिकमधील मॅरेथॉन शर्यतीच्या वेळी आपल्याला कोणते पेय घेता येईल याचा अभ्यास तिने केला पाहिजे होता. निकोलाय यांनी तिला पेय घेण्यास नकार दिला असल्याचे आढळून आले व त्यामुळे निकोलाय यांच्यावर आता तोंडसुख घेतले जात आहे. याच शर्यतीत भारताची अन्य धावपटू कविता राऊत ही देखील सहभागी झाली होती. आपल्याला पेय देण्यात आले होते व भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने त्याबाबत व्यवस्थाही केली होती, असा खुलासा कविता हिने या स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर केला होता. हे लक्षात घेतले तर जैशाबाबत खरोखरीच निकोलाय यांनी दुजाभाव केला असावा व तो का केला हेदेखील जाणून घेण्याची गरज आहे. प्रत्येक संघाबरोबर साहाय्यक प्रशिक्षक असतो जेव्हा परदेशी प्रशिक्षकांबाबत काही मतभेद असतील, तर भारतीय खेळाडूंनी या साहाय्यक प्रशिक्षकाची मदत घेणे जरुरीचे असते.

परदेशी प्रशिक्षकदेखील स्वच्छ प्रतिमेचे असतात याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. काही वर्षांपूर्वी भारताच्या महिला वेटलिफ्र्टसना एका परदेशी प्रशिक्षकाने बदनाम करण्यासाठी त्यांच्या अन्नपदार्थामध्ये उत्तेजक पदार्थ मिसळला होता व त्यामुळे दोन महिला वेटलिफ्टर्सवर बंदीची कारवाईही झाली होती. निकोलाय यांच्यावर कदाचित हकालपट्टीची कारवाई होऊ शकेल. त्यांच्याजागी अन्य कोणी परदेशी प्रशिक्षक येईल. या प्रशिक्षकावर किती अवलंबून राहायचे हे संबंधित खेळाडू व भारतीय संघटकांनी ठरविले पाहिजे. त्यामध्येच त्यांचे हित आहे.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com