आज जयपूर-पाटणा यांच्यात अंतिम लढत

प्रो कबड्डी लीगच्या पदार्पणाच्या वर्षांत जेतेपद मिळवणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स आणि गतविजेत्या पाटणा पायरेट्स यांच्यात रविवारी प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामाची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यामुळे जिंकणारा संघ हा दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घालणार आहे. महिलांच्या प्रायोगिक स्वरूपातील तिरंगी स्पध्रेत तेजस्विनी बाईच्या नेतृत्वाखालील स्टॉर्म क्वीन्स आणि ममता पुजारीच्या नेतृत्वाखालील फायर बर्ड्स संघाशी सामना होणार आहे.

अभिषेक बच्चनच्या मालकीच्या आणि जसवीर सिंग कर्णधार असलेल्या जयपूर संघाने शुक्रवारी अनपेक्षित कामगिरी बजावताना राहुल चौधरीच्या तेलुगू टायटन्सला हरवण्याची किमया साधली. जसवीर सिंग, राजेश नरवाल आणि अजय कुमार यांच्यावर जयपूरच्या चढायांची तर अमित हुडा आणि रण सिंग यांच्यावर बचावाची मदार असेल.

‘‘आता जेतेपदापासून आम्ही एका पावलावर आहोत. सलग दुसऱ्यांदा जेतेपद प्राप्त करण्यासाठी आम्ही जिवापाड मेहनत घेऊ,’’ असा विश्वास पाटणा संघाचे व्यवस्थापक कार्तिक सनसनवाल यांनी व्यक्त केला.

उपांत्य लढतीत पाटण्याने मनजीत चिल्लरच्या नेतृत्वाखालील पुणेरी पलटणची घोडदौड रोखली. फझल अत्राचाली आणि हादी ओश्तोरॅक यांच्या इराणी बचाव फळीच्या बळावर सर्वात बलाढय़ संघ म्हणून मैदानावर नावारूपास आलेल्या पाटण्याचा कुलदीप सिंगवर भरवसा आहे. तर प्रदीप कुमार आणि राजेश मोंडल यांच्यावर पाटण्याच्या बचावाची भिस्त असेल.

‘‘ज्या संघाचा बचाव अभेद्य तोच संघ जिंकेल, हे माझे म्हणणे उपांत्य लढतीत सार्थ ठरले आहे. अंतिम फेरीतसुद्धा बचावाचीच प्रमुख भूमिका असेल,’’ असे जयपूरचा कर्णधार जसवीरने सांगितले.

आजचे सामने

  • वेळ : सायंकाळी ७ वा.
  • पुणेरी पलटण वि. तेलुगू टायटन्स
  • वेळ : रात्री ८ वा.
  • स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्ड्स
  • वेळ : रात्री ९ वा.
  • पाटणा पायरेट्स वि. जयपूर पिंक पँथर्स
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स