सात वर्षांनंतर सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाला शुक्रवारी बलाढय़ चीन संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. २०११साली उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताला १-३ अशा फरकाने चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारत व पदक यांच्यामध्ये चिनी भिंतीचा अडथळा आला आहे. सात वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे.

चीनच्या संघात लीन डॅन आणि चेन लाँग (रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता) या दोन ऑलिम्पियन विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे भारताच्या पुरुष एकेरीतील खेळाडूंना या दोघांचे बलाढय़ आव्हान पेलण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पुरुष एकेरिीत किदम्बी श्रीकांत यानेच लीन डॅनला नमवण्याची किमया केली आहे. त्यामुळे येथेही २०१४च्या चीन खुल्या टेनिस स्पध्रेतील कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा श्रीकांतकडून आहे.

महिला एकेरित रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूसमोरही खडतर आव्हान आहे. तिला हे बिंगजिओ आणि सून यू या अनुक्रमे जागतिक क्रमवारीत सातव्या व सहाव्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सिंधूला बिंगजिओकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, तर सिंधूची सूनविरुद्धची जय पराजयाची आकडेवारी ३-४ अशी आहे.

महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन क्विंग्चेन व जिया यिफान आणि बाओ यिक्सिन व टँग जिन्हूआ यांचा अडथळा पार करण्यासाठी भारताच्या अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी जोडीला तुल्यबळ संघर्ष करावा लागणार आहे. मिश्र दुहेरीतही अश्विनी आणि युवा खेळाडू सात्विकसाईराज रॅन्कीरेड्डी यांना सातत्यपूर्ण खेळ करून जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लू काई व हुआंग याकिओंग यांच्यावर विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

पुरुष दुहेरीत लियू युचेन व ली जुन्हुई आणि झँग नान आणि फू हैफेंग हे दोन बलाढय़ पर्याय चीनकडे आहेत. त्यामुळे भारताच्या बी सुमिथ रेड्डी आणि मनू अत्री या जोडीची कसोटी लागणार आहे.  दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत जपान आणि मलेशिया यांच्यात लढत रंगणार आहे.