महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेवर सहज मात

रेल्वेचा आंतरराष्ट्रीय मल्ल सुमीत कुमारने पुण्याचा अभिजीत कटके याच्यावर ९-२ अशा गुणांनी मात केली आणि ५० व्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ‘हिंद केसरी’ किताब पटकावला.

सणस मैदानावर झालेल्या या लढतीत सुमीतने चांदीची गदा व अडीच लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. अभिजीतला दीड लाख रुपयांची कमाई झाली. हिंद केसरी किताबाच्या उपांत्य साखळी गटात सुमीतने अभिजीतला ६-१ अशा गुणांनी हरविले होते. त्यामुळे पुन्हा अंतिम फेरीत तोच बाजी जिंकेल अशी अपेक्षा होती. अंतिम फेरीत अपेक्षेइतकी लढत अभिजीत देऊ शकला नाही.

अंतिम फेरीतील पहिल्या सात मिनिटात सुमीतने ६-२ अशी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली. त्याने या सात मिनिटांमध्ये डावावर दोन गुण, तर अभिजीतला चार वेळा बाहेर ढकलत प्रत्येकी एक गुण मिळविला. सहाव्या मिनिटाला अभिजीतने पटात घुसून सुमीतला चीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याला दोन गुणांची कमाई झाली. सात मिनिटांच्या दुसऱ्या फेरीत सुमीतने सुरुवातीला एक गुण व त्यानंतर दोन गुणांची आपली आघाडी ९-२ अशी वाढविली. या आघाडीनंतर त्याने बचावात्मक पवित्रा घेतला. अभिजीतने आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र त्याचे शरीर थकले होते. त्यामुळे त्याला अपेक्षेइतके डावपेच करता आले नाहीत. सुमीत त्याच्यापेक्षा चपळ असल्यामुळेही अभिजीतला फारशी संधी मिळाली नाही.

उपांत्य फेरीपूर्वीच मला विजेतेपदाची खात्री होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील अनुभवाचा मला नेहमीच फायदा झाला आहे. त्यातच उपांत्य साखळी लढतीत मी अभिजीतला सहज हरविले होते. त्यामुळे अंतिम फेरीत विजय आपलाच आहे, अशी खूणगाठ मी मनाशी बांधली होती.    – सुमीत कुमार, हिंदकेसरी