मालिकेतील पराभवाचे धोनीकडून स्पष्टीकरण
स्थर्याचा अभाव असल्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्यात भारतीय संघाला अपयश येते, असे स्पष्टीकरण संघनायक महेंद्रसिंग धोनीने दिले. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-३ अशी हार पत्करल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने संघाच्या कामगिरीबाबत आपली मते प्रकट केली.
‘‘आपण संघाचे भविष्यातील चित्र रेखाटायला हवे. अन्यथा आपण एखाददुसरी मालिका जिंकू, पण सातत्यपूर्ण कामगिरीसाठी संघात स्थर्याची नितांत आवश्यकता असते,’’ असे धोनीने सांगितले. वानखेडे स्टेडियमवरील पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४३९ धावांचे अजस्त्र लक्ष्य उभे केले आणि भारताने २१४ धावांनी हार पत्करली.
निर्णायक सामन्यात भारताच्या दृष्टीने काय चुकीचे घडले, या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला, ‘‘सामन्यात चुका कुठे झाल्या? हा प्रश्न आज तरी नका विचारू! प्रतिस्पर्धी संघाने साडेचारशेच्या आसपास धावसंख्या उभी केली आणि तुम्ही विचारता चूक कुठे झाली? काही झेल सुटले, सुरुवातीला आम्ही आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आणि फलंदाजांना धावा काढण्याची संधी मिळाली. २०-२५ षटकांपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने धावांचा वेग वाढवला आणि १०-१२-१५ धावा प्रत्येक षटकाला निघू लागल्या. ४३८ ही धावसंख्या गाठणे अतिशय अवघड गोष्ट आहे.’’
‘‘दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वानखेडेवर शानदार फलंदाजी केली. आम्ही ते आव्हान पेलण्याच्या दृष्टीने रणनीती आखली. काही चांगल्या भागीदाऱ्या करून ५० षटकांपर्यंत खेळण्याचा निर्धार केला होता. परंतु नियोजनाप्रमाणे काही वेळा घडते, पण काळी वेळा घडत नाही,’’ असे धोनीने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत धोनीने फलंदाजीच्या क्रमवारीत अनेकदा बदल केले. मात्र त्याचे समर्थन करताना तो म्हणाला, ‘‘सामन्याच्या ठिकाणानुसार आणि खेळपट्टीनुसार बदल करावे लागतात. आमची फलंदाजीची फळी ताकदीने दिसण्यासाठी मी फलंदाजीच्या क्रमवारीत काही बदल केले. धावांचा पाठलाग करताना ही फळी कसे कार्य करील, या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.’’
‘‘वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची भारतीय संघाला आवश्यकता आहे. आम्ही स्टुअर्ट बिन्नीला संधी दिली. लोकांनी त्याच्यावरही टीका केली. पण भारतातील अष्टपैलू खेळाडूंचा विचार केल्यास वेगवान गोलंदाजी करणारा स्टुअर्ट बिन्नी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याचप्रमाणे फिरकी गोलंदाजांचा विचार केल्यास रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. मग तुम्हाला ते आवडो अथवा न आवडो.’’
‘‘चांगल्या वेगवान गोलंदाजीसमोर भारताच्या तळाच्या फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट होतात. त्यामुळे आघाडीच्या सहा फलंदाजांवर दडपण येते. या परिस्थितीत एक-दोन फलंदाज लवकर बाद झाल्यास तुमच्याकडे तीन-चार फलंदाजच उरतात. तळाच्या फलंदाजांवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही,’’ असे धोनीने सांगितले.
भारताच्या वेगवान गोलंदाजीचे पृथक्करण करताना धोनी म्हणाला, ‘‘वेगाने गोलंदाजी करू शकतील अशा वेगवान गोलंदाजांना आम्ही संधी देऊन पाहिले आहे. परंतु ते अधिकाधिक धावा देत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे उत्तम दिशा आणि टप्पा असलेल्या गोलंदाजांवर आपण भर देतो. मोहित शर्माला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून वापरणे अपेक्षित आहे. परंतु सामन्यानुसार सारे पेचप्रसंग समोर येतात. शेवटच्या षटकांमध्ये कोण गोलंदाजी करणार? मधल्या षटकांमध्ये कोण गोलंदाजी करणार? तसेच नवा चेंडू कोण वापरणार?’’तो पुढे म्हणाला, ‘‘आम्ही अनेक वेगवान गोलंदाज वापरले आहेत, जे संघासाठी उपयुक्त ठरू शकलेले नाहीत. परंतु देवधर करंडक किंवा दुलीप करंडक किंवा आयपीएल स्पर्धामध्ये त्यांची कामगिरी अतिशय चांगली होते.’’