‘‘टेनिस लीगमध्ये अनेक नावाजलेले जगज्जेते खेळाडू सहभागी झाल्यामुळे ही स्पर्धा चाहत्यांची अपेक्षापूर्ती करणारीच आहे. बिनतोड सव्‍‌र्हिस, परतीचे झंझावाती फटके, डबल हँडेड पासिंग शॉट्सही हे कौशल्य पाहावयास मिळत असल्यामुळे ही लीग चाहत्यांच्या हृदयस्थानी आहे,’’ असे मत ज्येष्ठ डेव्हिसपटू व टेनिस समालोचक विजय अमृतराज यांनी व्यक्त केले. अमृतराज यांच्याच संकल्पनेतून चॅम्पियन टेनिस लीग साकारत आहे. अमृतराज यांनी भारताकडून अनेक डेव्हिस स्पर्धामध्ये तसेच अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. टेनिस संघटक, समालोचक व प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. १९७४ मध्ये येथे भारतीय संघाने रशियाविरुद्ध विजय मिळवत डेव्हिस चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी भारतीय संघात आनंद व विजय या अमृतराज बंधूंचा समावेश होता. या बंधूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच भारतास हा सामना जिंकता आला होता. भारतीय टेनिसविषयी तसेच त्यांनी येथे खेळलेल्या डेव्हिस सामन्यांविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत-
पुण्यातील डेव्हिस सामन्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल?
पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबवर आम्ही ४० वर्षांपूर्वी आम्ही डेव्हिस सामना खेळलो होतो. तो सामना अजूनही आमच्या मनात साठवून राहिला आहे. त्याची आठवण आली, की अंगावर काटे उभे राहतात. येथील चाहत्यांनी आम्हाला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो. हा सामना पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक उपस्थित होते. रशियन संघात आमच्यापेक्षा खूप अनुभवी व मानांकित खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला गेला होता. मात्र आनंद याने खूपच छान खेळ केला. आम्ही सर्वच खेळाडूंनी जिद्दीने या सामन्यात विजयश्री खेचून आणली. त्यामुळे पहिल्यांदाच भारतास डेव्हिस स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळाले होते. खऱ्या अर्थाने आम्हा बंधूंना त्या वेळी भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर चाहत्यांनी आमच्यावर खूप प्रेम केले आहे. क्रिकेटमध्ये जसे हिरो होतात, तसेच त्या वेळी आमच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला होता.
शिवछत्रपती स्टेडियमवर डेव्हिस सामना होईल काय?
या स्टेडियमच्या मी प्रेमात पडलो आहे. या ठिकाणी भारताने डेव्हिस सामना आयोजित करावा अशी सुंदर ही जागा आहे. येथील सुविधाही खूपच छान आहेत. मी येथे दर वर्षी टेनिस लीगबरोबरच चॅलेंजर स्पर्धेची मालिका आयोजित करण्याचा विचार करीत आहे.
पूर्वीच्या तुलनेत टेनिसला आता भरपूर प्रसिद्धी मिळते काय?
हो, आता टेनिसपटूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. आमच्या वेळी मुळातच क्रीडा क्षेत्राविषयी फारशी जागृती नव्हती. त्या वेळी क्रिकेटलादेखील थोडीशी प्रसिद्धी मिळत असे. साहजिकच बाकीचे खेळ तर प्रसिद्धीपासून खूप लांब होते. एक मात्र निश्चित, की आम्ही डेव्हिस चषक स्पर्धेत एकदिलाने खेळायचो. देशासाठी खेळताना ऊर भरून यायचा आणि खेळाचाही मनमुरादपणे आम्ही आनंद घेत होतो.
टेनिस लीगविषयी तुमची अपेक्षापूर्ती झाली आहे काय?
माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद या लीगला मिळाला आहे. परदेशातील अन्य काही खेळाडूही पुढच्या लीगसाठी उत्सुकता दाखवीत आहेत. यंदा मी ही लीग प्रायोगिक तत्त्वावर केली होती. या लीगला मिळत असलेले यश लक्षात घेता दर वर्षी ही स्पर्धा याच कालावधीत आयोजित केली जाण्याचा विचार आहे.
महेश भूपतीच्या स्पर्धेला आव्हान म्हणून ही स्पर्धा आहे काय?
तसे मी म्हणणार नाही, कारण त्याने भारत व अन्य देशांत त्याची स्पर्धा घेतली आहे. मी प्रामुख्याने भारतातच ही लीग घेत आहे आणि स्थानिक खेळाडूंना त्यामध्ये संधी देत आहे. जेवढय़ा जास्त स्पर्धा होतील तेवढी भारतीय खेळाडूंना अधिकाधिक प्रेरणा मिळेल, अशी माझी खात्री आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशासाठी खेळणाऱ्यांनाच शासनाची मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याविषयी तुमचे काय मत आहे?
शासनाचा निर्णय योग्यच आहे. जेव्हा कोणतीही उद्योगसंस्था तुम्हाला पुरस्कृत करीत असते, त्या वेळी त्यांनी ज्या काही अटी दिलेल्या आहेत, त्या पाळणे तुमच्यावर बंधनकारक आहे. शासनाने जर एखाद्या स्पर्धेसाठी खेळाडूंना आर्थिक सहकार्य केले असेल, तर या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायला पाहिजे. देशासाठी खेळण्याचा मान मिळणे, ही तर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खेळाडूंनी आशियाई, राष्ट्रकुल व ऑलिम्पिकसारख्या स्पर्धाना प्राधान्य दिले पाहिजे, कारण देश आहे म्हणून आपण आहोत. वैयक्तिक स्पर्धासाठी आवश्यक असणारे मानांकन गुण तुम्हाला अन्य अनेक स्पर्धामध्ये मिळू शकतात. मात्र या प्रतिष्ठेच्या स्पर्धा चार वर्षांतून एकदाच येत असतात.