वन-डे, टी-२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात तब्बल १६५ बळी स्टम्पिंग करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नावलौकिक कमावला आहे. मोठा फटका खेळण्याच्या पवित्र्यात असलेल्या फलंदाजाला धोनी केव्हा बाद करतो, याचा त्यालाही पत्ता लागत नाही. मात्र, मैदानावर समोरच्या फलंदाजाची दांडी गुल करणारा धोनी आतापर्यंत स्वतः फलंदाजी करताना केवळ पाचवेळा स्टम्प आऊट झाला आहे.

अवश्य वाचा – पराभवानंतरही विराट कोहलीचा विश्वविक्रम, दुसऱ्या सामन्यात ‘या’ ११ विक्रमांची नोंद

गुवाहटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनी स्टम्प आऊट झाला. इतर फलंदाजांप्रमाणे धोनीलाही या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. आतापर्यंत धोनी कशाप्रकारे स्टम्प आऊट झाला आहे, यावर एक नजर टाकणार आहोत.

५. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी टी-२०, गुवाहटी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताची सलामीची फळी पुरती ढेपाळली. अशावेळी मधल्या फळीतला महत्वाचा फलंदाज या नात्याने धोनीवर भारतीय डावाची जबाबदारी होती. भारताची धावसंख्याही कमी असल्याने धोनी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं सर्वांना वाटत होतं. मात्र अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनी स्टम्प आऊट झाला, आणि भारताचा डाव आणखीनच गडगडला.

४. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, चेन्नई, २०११ विश्वचषक

२०११ साली भारतात खेळवल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनी वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर स्टम्प आऊट झाला होता. बिशुच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात धोनी स्टम्प आऊट झाला होता.

३. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कानपूर कसोटी, २००८

अहमदाबाद येथील सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ कानपूरमध्ये दाखल झाला होता. भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार अनिल कुंबळेने या सामन्यातून माघार घेतल्यामुळे धोनीवर या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कसोटी कर्णधार म्हणून धोनीचा हा पहिला कसोटी सामना ठरला. या सामन्यात पॉल हॅरिसच्या गोलंदाजीवर धोनी मोठा फटका खेळायला गेला. यावेळी मार्क बाऊचरने धोनीला स्टम्प आऊट करत भारताला मोठा धक्का दिला होता.

२. भारत विरुद्ध बांगलादेश, ढाका कसोटी, २०१०

२०१० साली बांगलादेशविरुद्ध खेळताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला २३३ धावांमध्ये ऑलआऊट केलं. यानंतर राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या अर्धशतकाने सामन्यात भारताची बाजू वरचढ झाली होती. यानंतर धोनी मैदानात फलंदाजीसाठी आल्यानंतर त्यानेही काही सुरेख फटके खेळत भारताची बाजू आणखी मजबूत केली. मात्र, बांगलादेशचा लेग स्पिनर गोलंदाज रकिबुल हसनने धोनीला चकवण्याची किमया साधली, यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक मुश्फीकुर रहीमने धोनीचा बाद करत भारतीय संघाला धक्का दिला.

१. भारत विरुद्ध पाकिस्तान, फैजलाबाद कसोटी, २००६

२००६ साली भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. कर्णधार द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात झालेल्या चांगल्या भागीदारीनंतरही भारताचा डाव गडगडला. यानंतर इरफान पठाण आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भारतासाठी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. मात्र, दानिश कनेरियाच्या गोलंदाजीवर कामरान अकमलने धोनीला स्टम्प आऊट करत भारताला आणखी एक धक्का दिला होता.