एकाच शहरात राहूनही ते एकमेकांपासून दूर होते. गेली तीन वष्रे ते नवी दिल्लीतल्या विविध विद्यापीठांमध्ये शिकत आहेत. पण येथे राहणाऱ्या आपल्याच देशवासीयांशी त्यांचा संवाद तुटला होता. मात्र फुटबॉलने त्यांना एकत्र आणले. केवळ देशातीलच नव्हे, तर शेजारील राष्ट्रातील विद्यार्थीही फुटबॉलच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एकवटले. स्टेडियमच्या एका स्टॅण्डवर हे विद्यार्थी एकवटून कोणत्या तरी भाषेत प्रोत्साहनपर गीत गात होते. ते काय गात होते, हे कुणाला कळत नव्हते. पण त्यांचा प्रोत्साहन हा इतर प्रेक्षकांनाही ऊर्जा देत होता. माजी विजेत्या घाना संघांचा मनोबल उंचावण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेला हा गट सर्वाचे लक्ष वेधत होता.

शारदा विद्यापीठामध्ये फार्मसीच्या अभ्यासासाठी नायजेरियावरून आलेला पिटो म्हणाला, ‘‘डेजी माझ्यासोबत शारदा विद्यापीठामध्ये शिकतो. ती घानाची आहे आणि तिने फुटबॉल सामना पाहायला जात असल्याचे सांगितले. आमचा संघ या स्पध्रेत खेळत नसला तरी शेजारील राष्ट्राला प्रोत्साहन देण्यासाठी मी येथे आलो आहे. दिल्लीत शिक्षणासाठी आलेल्या घानातील सर्व विद्यार्थ्यांना डेजीने या सामन्यासाठी एकत्र आणले. मला माहीत नाही, तिने हे कसे केले. पण आज आम्ही फुटबॉलच्या निमित्ताने एकत्र आहोत.’’

घानाचे हे विद्यार्थी त्यांच्या ‘असांते त्वी’ या राष्ट्रीय भाषेत टाळ्यांचा ताल धरत गाणे गात होती. पिटोला ही भाषा कळत नसली तरी तो त्यांच्या सुरात सूर मिसळत होता. हे चित्र पाहून भारतीय प्रेक्षकांनी ताल धरून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. डेजीने १०-१५ विद्यार्थ्यांना एकत्र आणून हा गट बनवला होता. याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, ‘‘गेली तीन वष्रे आम्ही दिल्लीतल्या विविध शिक्षण संस्थेत शिकत आहोत. पण आमचा एकमेकांशी संवाद होत नव्हता. भारतातील विश्वचषक स्पध्रेतील घानाचे सामने दिल्लीत होणार हे निश्चित झाले तेव्हापासून मी येथील विद्यार्थ्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. विविध शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक मिळवले व हा गट बनवला.’’