मैदानावर मर्दुमकी गाजविणारे व चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेले खेळाडू राजकीय मैदानावर यश मिळवितातच असे नाही. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता नेमबाज राजवर्धनसिंह राठोडने लोकसभा निवडणुकीच्या पर्दापणातच अचूक नेम साधला आहे, मात्र ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन व महम्मद कैफ यांचा सपशेल त्रिफळा उडला आहे. त्याचप्रमाणे ख्यातनाम फुटबॉलपटू बायच्युंग भूतिया व हॉकीपटू दिलीप तिर्की यांनाही राजकीय मैदानावर चमक दाखविण्यात अपयश आले आहे.
राजवर्धनने भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविताना जयपूर ग्रामीण मतदारसंघात बाजी मारली. त्याने राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी.जोशी यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी धुव्वा उडविला. त्याला ६ लाख ३२ हजार ९३० मते मिळाली तर जोशी यांना तीन लाख ३४ मते मिळाली.
दार्जिलिंगमध्ये तृणमूल काँग्रेसकडून आपले नशीब आजमावण्यात भूतियाला अपयश आले. भाजपचे एस.एस.अहलुवालिया यांनी त्याचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला. अहलुवालिया यांना ४ लाख ८७ हजार ५६४ मते मिळाली तर भूतियाला २ लाख ९० हजार ७६९ मते मिळाली.
विद्यमान खासदार अझहरुद्दीन यांनी मुरादाबादऐवजी यंदा राजस्थानमधील टोंक सवाईमाधोपूर मतदार संघातून निवडणूक लढवली. भाजपचे सुखबीरसिंग जौनपुरिया यांनी त्यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. सुखबीरसिंग यांना ५ लाख ४८ हजार १७९ मते मिळाली तर अझहरुद्दीन यांना ४ लाख १२ हजार ८६८ मते मिळाली.
आणखी एक क्रिकेटपटू कैफला या निवडणुकीत अपयश आले. फुलपूर मतदार संघात तो चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. ही जागा भाजपचे केशवप्रसाद मौर्य यांनी पाच लाखांहून अधिक मते मिळवित जिंकली. हॉकीपटू तिर्कीला ओडिशामधील सुंदरगढमधून निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्याला एक लाख ९९ हजार १६९ मते मिळाली, तर भाजपचे विजयी उमेदवार जुएल ओराम यांना दोन लाख ९ हजार ९४४ मते मिळाली.