किताबी लढतीत पुण्याच्या अभिजित कटकेला २-० असे नमवले

जळगावच्या विजय चौधरीने अपेक्षित निकालाची नोंद करताना सलग तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पध्रेत जेतेपदाला गवसणी घातली. तमाम कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पध्रेत विजयने अतिशय शांतपणे खेळ करून पुण्याच्या अभिजित कटकेला २-० ने पराभूत केले. विजयने सलग तिसऱ्यां ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब मिळवत मुंबईच्या नरसिंग यादवच्या विक्रमाशी बरोबरी केली.

गादी विभागात अभिजितने लातूरच्या सागर बिराजदारवर मात करून अंतिम फेरी गाठली होती, तर माती विभागात विजयने विलास डोईफोडेचे आव्हान परतवून लावत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. २८ वर्षीय विजयकडे पुरेसा अनुभव होता, तर २० वर्षीय अभिजित तसा त्याच्यासमोर नवखा होता. मात्र, अंतिम लढत गादीवर होणार असल्याने आणि अभिजितलाही कमी लेखून चालणार नव्हते. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत या किताबी कुस्तीला सुरुवात झाली.

निर्णायक कुस्ती होईल, या आशेने मोठ्या प्रमाणावर कुस्तीप्रेमींनी वांजळे क्रीडानगरीत गर्दी केली होती. दोन्ही मल्लांना चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. निळ्या जर्सीत खेळणारया विजयकडे कुस्तीचा पुरेसा अनुभव होता. त्यामुळे प्रतिस्पध्र्याला फारशी संधीच द्यायची नाही, असे त्याने ठरविले होते. त्याच्या खेळातून ते स्पष्ट जाणवत होते. पहिल्या फेरीच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचा अंदाज घेतला. पुढचे काही सेकंद काहीच घडत नव्हते. त्यामुळे चाहत्यांमध्येही शांतता पसरली होती. नकारात्मक कुस्तीचा एक गुण विजयला बहाल करण्यात आला. त्यामुळे पहिल्या फेरीनंतर विजय १-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीतही विजयला नकारात्मक कुस्तीचा एक गुण मिळाला. अखेरच्या काही सेकंदांत अभिजित आक्रमक दिसला, तर २-० अशी आघाडी असल्यामुळे विजयचा कल कुस्ती न करण्याकडेच होता. त्यामुळे घाई करून हाताशी असलेली आघाडी त्याला घालवायची नव्हती. अभिजितने त्याची पकड करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण विजयने त्याला संधी दिली नाही आणि निर्धारित वेळेत विजयने ही लढत २-० ने जिंकली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी चांदीची गदा विजयला देण्यात आली.