भारतीय संघात एकवेळ विराट कोहलीला पर्याय म्हणून फलंदाज सापडेलही पण सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा सारख्या दिग्गज खेळाडू यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, अशी भावना पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या संघाचे मिसबाह-उल-हक आणि युनूस खान यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. संघातून अनुभवी खेळाडूंच्या जाण्याने निर्माण होणाऱ्या पोकळीबाबत वकार युनूस बोलत होते.

”कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा ठोकलेल्या खेळाडूंचा पर्यायी खेळाडू तुम्ही शोधू शकत नाही. पाकिस्तानच्या संघात गुणवान खेळाडूंचा भरणा आहे आणि बाबर आझम सारख्या खेळाडूंना पुढाकार घेऊन संघाची जबाबदारी स्वीकारायला हवी. आपल्या खेळातून त्यांनी जगाला आपलं कौशल्य दाखवून द्यावं.”, असं वकार युनूस पाकमधील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

पाकिस्तानच्या संघातून निवृत्त होणाऱ्या खेळाडूंची जागा युवा क्रिकेटपटू नक्कीच भरून काढतात. वसीम अक्रम आणि मी जेव्हा निवृत्ती घेतली. त्यावेळी शोएब अख्तर आणि उमर गुल हे दोन सक्षम पर्याय उपलब्ध होते. पण सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना पर्याय नाही. विराट कोलहीच्या जागी एकवेळ पर्याय सापडेल पण सचिनच्या जागी नाही, असे वकार युनूस म्हणाले.