श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावरदेखील भारताचे वर्चस्व पाहायला मिळाले. दिवसाच्या पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा डाव ५५० धावांच्या आत संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र कसोटी पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने आक्रमक अर्धशतक फटकावत श्रीलंकन गोलंदाजांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. हार्दिक पांड्याने मोहम्मद शमीच्या साथीने ६२ धावांची भागिदारी करत भारताला ६०० धावांचा डोंगर रचण्यास मदत केली. यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुवात झाल्यावर भारतीय कर्णधार विराट कोहली काहीसा संतापलेला दिसला.

श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुवात झाल्यावर उमेश यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. दिमुख करुणारत्नेला अवघ्या २ धावांवर बाद करत उमेश यादवने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यावेळी श्रीलंकेच्या ९ धावा झाला होत्या. करुणारत्ने लवकर बाद झाल्यावर दुसऱ्या विकेटसाठी दानुशा गुनाथिलाका आणि उपुल थरंगा यांनी अर्धशतकी भागिदारी रचली. उपुल थरंगाने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजी अगदी व्यवस्थित खेळून काढली. ही जोडी फुटत नसल्याने भारतीय कर्णधार विराट कोहली निराश अवस्थेत दिसला. थरंगा बाद होत नसल्याने विराट कोहली क्षेत्ररक्षण करताना चिडला होता. त्यामुळेच थरंगाने फटकावलेला चेंडू सीमारेषेवर जाताच कोहलीने चेंडूला लाथ मारली.

उमेश यादवच्या षटकात ३९ धावांवर खेळणाऱ्या उपुल थरंगाने चेंडू ऑफ साईडला फटकावला. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेकडे जात असताना कोहली चेंडू अडवण्यासाठी धावत होता. चेंडूने सीमारेषेला स्पर्श केल्यावर तेथे उभे असलेल्या बॉल बॉयने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू पकडण्यासाठी बॉल बॉय खाली वाकला होता. मात्र तेवढ्यात चिडलेल्या कोहलीने चेंडूला लाथ मारली. त्यामुळे विराट कोहलीचा संताप पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळाला. उपुल थरंगाने पहिल्या डाव्यात अर्धशतक साजरे केले. खेळपट्टीवर जम बसवलेला थरंगा ६४ धावांवर बाद झाला.