चांगला खेळ होण्यासाठी खेळाडू सरावावर भर देतात, पण काही खेळाडू त्यापुढेही जाऊन काही तरी खास करण्याचा प्रयत्न करतात, तसेच काहीसे भारताचा तडफदार सलामीवीर वीरेंद्र सेहवागला सराव शिबिरात पाहिल्यावर कळू शकते. सराव शिबिरात सेहवाग चक्क चश्मा लावून सराव करत होता. वयपरत्वे खेळाडूची नजर कमजोर होते, त्याचा परिणाम कुठेतरी कामगिरीवर होताना दिसतो. यापूर्वी सेहवागला कानाने कमी ऐकू येत असल्याचे सर्वानीच ऐकले आहे. आता चश्मा लावून सराव करताना पाहिल्यावर सेहवागची नजर कमजोर झाली की काय, हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे. नजर कमजोर झाल्यामुळे सेहवाग चश्मा वापरत असेल तर त्याच्यापुढच्या समस्या यापुढे वाढतील. कारण निवड समिती संघनिवड करण्यापूर्वी खेळाडूची गुणवत्ता, फॉर्म आणि शारीरिक तंदुरुस्ती पाहत असते. त्यामुळे सेहवाग आता सामन्यातही चश्मा लावूनच खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.