मॅग्नस कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यांच्यातील विश्वविजेतेपदाच्या लढती म्हणजे जागतिक स्तरावर चर्चिला जाणारा विषय. या दोन दिग्गजांमध्ये झालेल्या जगज्जेतेपदाच्या मुकाबल्यात कार्लसननेच बाजी मारली होती. पाच वेळा जगज्जेतेपद जिंकणाऱ्या आनंदला कार्लसनच्या डावावर प्रतिहल्ला करण्यात वारंवार येणाऱ्या अपयशाला आनंदचे वय कारणीभूत असल्याच्या वावडय़ा क्रीडा क्षेत्रात उठू लागल्या. मात्र आनंदने या सर्व वावडय़ांना आपल्या कामगिरीतून अनेकदा उत्तर दिले आहे. नुकत्याच झालेल्या शामकिर बुद्धिबळ स्पध्रेत त्याने दुसरे स्थान पटकावून टीकाकारांना गप्प केले. आनंदच्या मते खेळाला वयाचे बंधन नसते आणि प्रत्येक दिवस हा नवा असतो व त्यातून नवे शिकायचे असते. महाराष्ट्र बुद्धिबळ लीगच्या निमित्ताने शुक्रवारी मुंबईत आलेल्या भारताच्या ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत-
आकाशगंगेतील एका ताऱ्याला विश्वनाथन आनंदचे नाव देण्यात आले आहे, याबद्दल काय सांगशील?
हा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. एक भारतीय नागरिक म्हणून हा अभिमानास्पद क्षण आहे. अलेक्झांड्रो अलेखिन आणि अनाटोली कार्पोव्ह या दोन दिग्गज बुद्धिबळपटूंच्या पंक्तीत मला स्थान मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो.

महाराष्ट्र बुद्धिबळ लीगची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे?
ही स्पर्धा भारतातील होतकरू खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ आहे. या लीगसोबत असल्याचा आनंद वाटतोय. लीगची वाटचाल योग्य दिशेने चालली आहे. देशातील महिला ग्रॅण्डमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टरसह खेळण्याची संधी युवा खेळाडूंना मिळते आणि त्याचा फायदा त्यांना खेळ सुधारण्यासाठी होत आहे.

भारतातील बुद्धिबळ क्षेत्राच्या आणि खेळाडूंच्या प्रगतीबाबत तुला काय वाटते?
भारतातील बुद्धिबळ प्रगतीवर मी खूश आहे. ‘चेस इन स्कूल’ या उपक्रमाच्या माध्यमातून याला आणखी वेग मिळाला आहे. आज भारतातून अनेक ग्रँडमास्टर तयार होत आहेत. जागतिक स्तरावर त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. प्रगतीबाबत बोलायचे झाल्यास प्रत्येक खेळाडूने स्वत: सुधारणा करून आपला खेळ उंचावायला हवा.

कार्लसन विरुद्ध आनंद, ही लढत जगभरात सर्वात जास्त चर्चा झालेली लढत मानली जाते. आतापर्यंत कार्लसनने यामध्ये बाजी मारली आहे. वाढत्या वयामुळे तुझ्या खेळावर परिणाम जाणवतोय का?
मला तसे वाटत नाही की वयाचा खेळावर परिणाम होतो. आता माझे वय वाढलेय
हे मी नाकारू शकत नाही. मी सर्वोत्तम
कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. या वर्षी वर्ल्ड चेस टूर खेळणार आहे. याचप्रमाणे पुढील वर्षी कॅनेडियन स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न असेल.

कार्लसनचे डावपेच मोडण्यासाठी काही विशेष डावपेचांवर अभ्यास सुरू आहे का?
कार्लसनविरुद्धची आगामी लढत पाहिल्यानंतरच ते तुम्हाला कळेल.