भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. परंतु भारतासारख्या बलाढय़ संघाशी भारतात सामना करण्यासाठी पुरेशी तयारी मात्र झालेली नाही, असे स्पष्टीकरण पाहुण्या श्रीलंका संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने दिले.
आर्थिक वाद विकोपाला गेल्यामुळे वेस्ट इंडिज संघाने भारत दौरा अर्धवट सोडला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीलंका क्रिकेट मंडळाला भारत दौऱ्यासाठी राजी केले. आता भारत दौऱ्यावर आलेला श्रीलंकेचा संघ भारत ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्याच्या पूर्वसंध्येला मॅथ्यूज म्हणाला, ‘‘आम्ही मालिका खेळण्यासाठी अनुत्सुक मुळीच नाही. भारत दौऱ्यासाठी अनुकूल तयारी मात्र आमची झालेली नाही. भारतात क्रिकेट खेळणे आव्हानात्मक असते, याची आम्हाला जाणीव आहे. भारताशी, विशेषत: भारतात मालिका खेळण्यासाठी उत्तम प्रकारे तयारी करण्याची आवश्यकता होती. गेले दीड महिने आम्ही तंदुरुस्तीकडे लक्ष देत होतो आणि अचानक या दौऱ्याचा कार्यक्रम ठरल्याने आम्हाला तयार व्हावे लागले.’’