अ‍ॅथलेटिक्स संघटनांचा क्रीडा संचालकाला सवाल

तब्बल १४ वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. येथील सिंथेटिक ट्रॅकचे काम तर अनेक वर्षांपासून रखडलेले असून हा सिंथेटिक ट्रॅक व अन्य प्रलंबित कामांना लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर विभागीय उपसंचालक सुभाष रेवतकर यांना केली.

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा संघटनांच्या एका शिष्टमंडळाने क्रीडा उपसंचालकांची भेट घेऊन रखडलेल्या कामांवर चर्चा केली. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, राज्यात इतर ठिकाणी क्रीडाक्षेत्राचा विकास होत आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गृहशहरात विभागीय क्रीडा संकुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, हे दुर्देव आहे. कासवगतीने सुरू असलेल्या सिंथेटिक ट्रॅकच्या कामाला गती दिल्यास स्थानिक धावपटूंसह विदर्भातील खेळाडूंना त्याचा फायदा होईल. सिंथेटिक ट्रॅक किती दिवसात पूर्ण होईल अशी विचारणा डॉ. सुर्यवंशी यांनी केली असून, यासंदर्भात आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी शिष्टमंडळाला उत्तर देतांना सुभाष रेवतकर म्हणाले की, सिंथेटिक ट्रॅकच्या जुन्या नकाशात २०० मीटरचे वॉर्मअप ट्रॅक होता. त्यात बदल केला असून आता ४०० मीटरची वॉर्मअप ट्रॅक मुख्य सिंथेटिक ट्रॅकशेजारी तयार करण्यात येणार आहे. या कामाला गती देण्यासाठी नव्या निविदा काढण्यात आल्या असून निधीही उपलब्ध आहे, त्यामुळे ट्रॅकसह इतर संकुलातील प्रलंबित काम पुन्हा सुरू करून सहा महिन्यात सिंथेटिक ट्रॅकचे काम पूर्ण झालेले दिसेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिष्टमंडळात नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एल.आर. मालविया, ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  विजय दातारकर, डॉ. सुरेंद्र तिवारी, डॉ. मुनीर अली, अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक जितेंद्र घोरदडेकर, अशफाक शेख, सचिन देशमुख, चंद्रकांत महाडिक, चित्रा पानतावणे उपस्थित होते.