मैं अपनी फेव्हरेट हूं, हे वाक्य तुम्हाला आठवता का? अगदी, बरोब्बर जब वी मेटमधील अल्लड, अवखळ गीत म्हणजेच करीना कपूर म्हणते मैं अपनी फेव्हरेट हूं, अगदी त्याच प्रमाणे सगळ्यांचा फेव्हरेट असलेला स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग देखील म्हणतो मैं अपना फेव्हरेट हूं.

आज तकने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याच्या दिलखुलास स्वभावानुसारच त्याने प्रश्नांना उत्तरे देताना चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या कारकीर्दीपासून ते त्याचे आवडते खेळाडू ते त्याचे ट्विटर अकाउंट या सर्व प्रश्नांना उत्तरे देताना त्याने कुठलाही आडपडदा ठेवला नाही.

सेहवागचे ट्विटर अकाउंट सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. आपल्या खास शैलीत ट्विट करणारा वीरू आपले सहकारी आणि चाहत्यांना ट्रोल करण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. इतर लोकांच्या शुभेच्छापेक्षा त्याच्या शुभेच्छा वाचणे हे नेहमीच आनंददायक असल्याची कबुली लाखो लोकांनी दिली आहे.

असे ट्विट लिहिण्या मागचे रहस्य काय विचारले असता त्याच्या शैलीचे ‘तत्वज्ञान’ काय आहे? त्याचा उगम कुठून झाला याचे उत्तर मिळते. मी नेहमीच लोकांचे मनोरंजन करीत आलो आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळतो तेव्हा पाहणाऱ्यांचे मनोरंजन होते. अगदी त्याच प्रमाणे जेव्हा माझे ट्विट लोक वाचतील तेव्हा त्यांचे मनोरंजन झाले पाहिजे असे मला वाटते.

या धकाधकीच्या जीवनात आधीच खूप ताण-तणाव आहे तेव्हा प्रेक्षकांना आणि वाचकांना आणखी का त्रास द्यावा असा सवाल त्याने यावेळी केला. त्यामुळेच तर मी माझे ट्विट मनोरंजन, विनोद आणि उपहासात्मक ठेवतो. जेणेकरुन मी जेव्हा ते पुन्हा वाचेल तेव्हा मला देखील आनंद होईल. मला नुकताच अभिनेता रणवीर सिंह भेटला. त्याने मला सांगितले की तो माझ्या ट्विट्सचा चाहता आहे. तो रात्री बेरात्री माझे ट्विट वाचून हसत असतो असे त्याने मला सांगितले. माझ्या ट्विट्सची स्तुती क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देखील केली आहे ते सर्वात मोठे प्रमाणपत्र असल्याचे मी मानतो असे त्याने म्हटले.

कुठल्याही फलंदाजाची तुलना इतर फलंदाजीशी करणे अयोग्य असल्याचे त्याने म्हटले. गेल्या काही मॅचेसचा विचार करता विराट कोहलीची सरासरी डॉन ब्रॅडमनपेक्षा सरस आहे. म्हणून त्याच्यावर तशीच कामगिरी करण्याचा दबाव टाकणे अयोग्य असल्याचे वीरेंद्र सेहवागने म्हटले. माझी तुलना सचिन तेंडुलकरशी होत असे. सचिनची शैली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यात मी कमालीचा अपयश ठरलो असे त्याने म्हटले.

सचिन तेंडुलकरसोबतच्या आठवणींना उजाळा देताना वीरेंद्र सेहवागने एक आठवण सांगितली. सचिन त्याच्या कसोटी कारकीर्दीमध्ये केवळ एकदाच स्टम्पिंगने आउट झाला आहे ते देखील माझ्यामुळे. आम्ही दोघे पीचवर चांगले स्थिरावलो होतो. मी सचिनला म्हटले बॉल फिरकी घेत नाहीये, तेव्हा बाहेर येऊन खेळल्यास काही हरकत नाही. सचिनला समजविण्यात मला दोन तीन ओव्हर लागल्या.

त्या पूर्ण मॅचमध्ये केवळ एकच बॉल वळला आणि त्याच बॉलवर सचिन आउट झाला. त्यादिवशी मी टी-ब्रेकमध्ये ड्रेसिंग रुममध्ये गेलोच नाही. अम्पायरच्या रुममध्ये बसून राहिलो. सचिननंतर येऊन बोलला की माझ्या पूर्ण कारकीर्दीमध्ये मी केवळ एकदाच स्टम्पिंगमुळे आउट झालो ते देखील तुझ्यामुळे.

अशा अनेक आठवणी सांगत सेहवागने चाहत्यांचे मनोरंजन केले. मला अनेक खेळाडू आवडतात. आणि त्या खेळाडुंमध्ये माझ्या स्वतःचा देखील समावेश आहे. त्यामुळेच मी माझा देखील फेव्हरेट असल्याचे त्याने म्हटले.