भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कारभार सांभाळण्यासाठी नावं सुचविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) शुक्रवारी कोर्टात ९ जणांची नावे बंद पाकिटातून सादर केली. पण अमायकस क्युरीने सुचविलेल्या नावांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे. बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी तुम्ही दिलेल्या यादीत वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींचा समावेश का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने अमाकस क्युरीला विचारला आहे. ‘बीसीसीआय’चा कारभार पारदर्शी करण्यासाठी याआधीच लोढा समितीने काही सुधारणा सुचवल्या आहेत. ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱयांमध्ये ७० वर्षांहून अधिक वर्षांच्या व्यक्तीचा समावेश नसावा, असे लोढा समितीकडून सुचविण्यात आले होते. ‘बीसीसीआय’ आणि लोढा समितीचा वाद सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने लोढा समितीने दिलेल्या शिफारशी कोणत्याही परिस्थितीत ‘बीसीसीआय’ला मान्य कराव्याच लागतील असे ठाम मत व्यक्त केले होते. त्यानंतरही ‘बीसीसीआय’ने शिफारशी लागू करण्यासाठी स्पष्ट नकार दिल्याने सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी देखील केली. त्यासोबतच नव्या पदाधिकाऱयांची नावं सुचविण्यासाठी ‘अमायकस क्युरी’ची स्थापना केली. ‘अमाकस क्युरी’मध्ये माजी कायदेतज्ज्ञ गोपाल सुब्रमण्यम आणि अनिल दिवाण यांचा समावेश करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीनुसार ‘अमायकस क्युरी’ने शुक्रवारी नऊ जणांची नावे बंद लिफाफ्यातून सादर केली. पण त्यावर ‘बीसीसीआय’ची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप नोंदवला.

वाचा: वैयक्तिक लढाई नाही, ‘बीसीसीआय’च्या स्वायत्ततेसाठी आजवर लढा दिला- अनुराग ठाकूर

 

कोर्टाने सहा जणांची नावे सुचविण्यास सांगितले असतानाही अमायकस क्युरीने नऊ जणांची नावं का सुचवली? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. दरम्यान, कोर्ट जोवर अंतिम निर्णय देत नाही तोवर ‘अमायकस क्युरी’ने सुचविलेली नावे गुप्त ठेवण्यासही कोर्टाने सांगितले आहे. पण ‘अमायकस क्युरी’ने सुचवलेल्या नावांमध्ये वयाची सत्तरी पार केलेल्यांचाही समावेश असल्याचे कोर्टाने विचारलेल्या सवालानंतर स्पष्ट झाले आहे.

सुप्रीम कोर्टाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटविण्यासोबतच दोघांना कारणेदाखवा नोटीस देखील बजावली होती. कोर्टासमोर शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? यावर उत्तर देण्याची नोटीस दोघांना पाठविण्यात आली आहे. लोढा समितीच्या शिफारशींमुळे अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यासोबतच येत्या काही काळात अनेक पदाधिकाऱयांवर गदा येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.