पाकिस्तानविरुद्धच्या अपयशाने त्यानंतर इंग्लिश संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाचा पिच्छा पुरविला. भारताने अनपेक्षितपणे जिद्दीने सामना वाचविण्याचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने फक्त नऊ धावांनी पराजय वाटय़ाला आला. फलंदाजी आणि गोलंदाजीमधील सातत्याचा अभाव भारतीय संघाला झगडायला लावत आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे दडपण अधिक वाढत आहे; परंतु दुसरा एकदिवसीय सामना जिंकून पुन्हा विजयपथावर परतण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे.
गेले काही महिने धोनीच्या मनासारखे काहीच घडत नाही. इंग्लिश संघाने भारतात कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर पाकिस्तानने भारतभूमीवर एकदिवसीय मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. मग नाताळची सुट्टी जोशात साजरी करून भारतात पुन्हा एकदिवसीय मालिकेसाठी परतलेल्या इंग्लंडने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या ‘कुक’नीतीचा पुन्हा प्रत्यय घडविला.
आता आणखी एक पराजय पत्करल्यास भारताला मालिकेत परतणे अवघड जाईल. त्यामुळे भारताने या पराभवांचा अभ्यास करून गांभीर्याने विचार करायला हवा. भारताची आघाडीची फळी वारंवार कोसळत आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ व्यवस्थापन चेतेश्वर पुजाराला मंगळवारच्या सामन्यात खेळविण्यासाठी आग्रही आहे, पण धोनीचा अद्याप पुजाराला खेळविण्यासंदर्भात विचार पक्का झालेला दिसत नाही.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अखेरच्या दोन षटकांत इंग्लिश फलंदाजांनी ३८ धावा काढल्या आणि त्याच नंतर भारताला महागात पडल्या. त्यामुळे भारताला मंगळवारची लढत जिंकायची असेल तर गोलंदाजीत प्रामुख्याने सुधारणा करावी लागेल. फिरकी गोलंदाजीमध्ये भारताची मदार असते ती ऑफ स्पिनर आर. अश्विनवर; परंतु गेल्या काही सामन्यांत तो आपला प्रभाव दाखवू शकलेला नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, सुरेश रैना, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, शामी अहमद.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जो रूट, इयान बेल, टिम ब्रेस्नन, डॅनी ब्रिग्स, जोसेफ बटलर, जेड डेर्नबॅच, स्टीव्हन फिन, स्टुअर्ट मीकर, क्रेग किस्वेटर, इऑन मॉर्गन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : दुपारी १२ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स.