प्रो-कबड्डी लीगमध्ये गतवर्षी आम्ही नवीन होतो. मात्र त्यापासून आम्ही धडा शिकलो असून यंदा विजेतेपद मिळवण्याच्याच निर्धाराने आम्ही उतरणार आहोत, असे पुणेरी पलटण संघाचा कर्णधार वझीर सिंगने सांगितले.
या लीगच्या लढतींना १८ जुलैपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी पुण्याच्या संघाचा सध्या शिवछत्रपती क्रीडानगरीत कसून सराव सुरू आहे. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अशोक शिंदे यांचे मार्गदर्शन या संघाला लाभले आहे. १७ जुलैपर्यंत पुण्याच्या संघाचा सराव सुरू राहणार आहे.
संघाच्या तयारीविषयी वझीर पुढे म्हणाला, ‘‘गतवर्षी झालेल्या चुका टाळण्यावर आम्ही सराव शिबिरात भर दिला आहे. चढाया व पकडी या दोन्ही आघाडय़ांवर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही भरपूर सराव केला आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंमध्ये चांगला समन्वय ठेवण्याचाही आमचा प्रयत्न राहील. गतवर्षी आम्हाला खेळाडूंच्या दुखापतींची समस्या जाणविली होती. यंदा शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता टिकविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. आमचा संघ अतिशय समतोल असून विजेतेपद मिळविण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत जिद्दीने खेळणार आहोत.’’
संघाचे व्यवस्थापक कैलास कांडपाल म्हणाले की, ‘‘गतवर्षीच्या तुलनेत यंदा आमच्या संघातील खेळाडूंची तयारी अधिक चांगली झाली आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीत अतिशय अव्वल दर्जाच्या सुविधा असल्यामुळे खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढली आहे. त्याचा फायदा आमच्या खेळाडूंना सामन्यांसाठी निश्चित होईल.’’