योगा हा स्पर्धात्मक खेळ म्हणूनच त्याला क्रीडा मंत्रालयाने प्राधान्य खेळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यामागे कोणताही जातियवाद नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सहसचिव ओंकार केडिया यांनी येथे सांगितले.
केडिया यांनी क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सांगितले, हा खेळ आपल्या देशातील पारंपरिक व मूलभूत व्यायामाचा क्रीडा प्रकार आहे. त्याची परंपरा टिकून राहण्यासाठीच या खेळास मान्यता देण्यात आली आहे. या खेळाचा अधिकाधिक प्रसार करण्याचे आमचे ध्येय आहे. प्राधान्य यादीत त्याला स्थान मिळाल्यामुळे आर्थिक निधी देताना त्याला प्राधान्य मिळणार आहे. राष्ट्रीय संघटनेच्या सहकार्यानेच विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय संघटनेच्या अभावी आपल्या देशातील गुणवान खेळाडूंचे नुकसान होत आहे. संघटनात्मक स्तरावरील मतभेद मिटविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. पॅराऑलिम्पिक संघटनेच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या खेळाला आंतरराष्ट्रीय महासंघाची मान्यता मिळावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.