झी मिडिया नेटवर्कने आपल्या टेन स्पोर्ट्स या खेळांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीची विक्री केली आहे. सोनी पिक्चरने तब्बल २५७९ कोटींना या वाहिनीचे मालकी हक्क विकत घतले. झी मिडियाने टेन स्पोर्ट्स ही वाहिनी २००६ मध्ये अब्दुल रेहमान बुख्तरी ताज ग्रुपकडून खरेदी केले होते. सोनी पिक्चरने ही रक्कम रोख स्वरुपात दिली आहे. त्यामुळे आता टेन १, टेन १ एचडी, टेन २, टेन ३, टेन गोल्फ एचडी, टेन क्रिकेट तसेच टेन स्पोर्ट्स या वाहिनीचे अधिकार सोनी पिक्चरला प्राप्त झाले आहेत. भारतासह सिंगापूर, हाँगकाँग, मध्य पूर्व आशिया आणि कॅरेबियन या देशात टेन स्पोर्ट्स वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. टेन स्पोर्ट्स क्रिकेट, फुटबॉलसह फाईट स्पोर्ट्स यासारख्या खेळांचे राष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावरील खेळांचे प्रक्षेपण केले जाते. झी नेटवर्कने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कंपनींमध्ये करार पूर्ण झाला आहे. हा सर्व व्यवहार रोखीत झाल्याचे सांगण्यात येते. झी मीडिया ही वाहिनी विकत घेण्यापूर्वी दुबईस्थित ताज टेलिव्हिजनकडून याचे नियंत्रण केले जात होते.