तिरंदाज व अ‍ॅथलिट्सचा समावेश असलेल्या भारतीय पथकातील निम्म्याहून अधिक खेळाडूंचे येथे आगमन झाले असून ते येथील ऑलिम्पिक क्रीडानगरीत विसावले, अशी माहिती भारतीय पथकाचे मुख्य राकेश गुप्ता यांनी सांगितले.

ऑलिम्पिक क्रीडानगरीत आल्यानंतर आमचे खेळाडू भारावून गेले. हळूहळू आम्ही येथील सुविधांविषयी अंदाज घेत आहोत, असे सांगून गुप्ता म्हणाले, भारतामधून येथे येण्यासाठी आमच्या खेळाडूंना खूप दूरचा प्रवास करावा लागला होता. त्यामुळे कधी एकदा क्रीडानगरीत पोहोचतो याचीच उत्सुकता त्यांना वाटत होती. भारतीय पथकाचा अधिकृत स्वागत समारंभ दोन ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या वेळी तिरंगा ध्वज फडकाविला जाणार आहे.

आमच्या धावपटूंनी सरावास सुरुवात केली आहे. एरवी त्यांना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये परदेशी खेळाडूंबरोबर झुंजावे लागते. त्यातील बरेचसे स्पर्धक येथे आहेत. मात्र ऑलिम्पिकसाठी त्यांनी काही वेगळी तयारी केली आहे काय याची चाचपणी आमचे खेळाडू करीत आहेत, असेही गुप्ता यांनी सांगितले.  आतापर्यंत भारताचे तिरंदाज, अ‍ॅथलिट्स, बॉक्सर व नेमबाजांचे येथे आगमन झाले होते.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंग याने सांगितले, आम्ही येथे थेट स्वित्र्झलडहून आलो आहोत. आमच्यासाठी हा प्रवास खूप थकवा निर्माण करणारा होता.