इथियोपियातील दडपशाहीचा ऑलिम्पिकमध्ये केला निषेध

आपल्या देशातील राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यासाठी त्याने ऑलिम्पिकसारखे व्यासपीठ निवडले. हाच द्वेष मनात ठेवत तो ऑलिम्पकमध्ये धावला आणि मॅरेथॉनमध्ये रौप्यपदकही पटकावले. पण पदक पटकावल्यावर त्याने आनंद साजरा केला नाही, उलटपक्षी त्याने या दडपशाहीचा निषेधच केला. त्याचा हा निषेध साऱ्या जगाने पाहिला. पण आता त्याला मायदेशात जाणे अवघड होऊन बसले आहे. शिक्षेच्या भीतीने तो मायदेशात परतलेला नाही. तर त्याने अमेरिका किंवा अन्य मोठय़ा देशाचा आश्रय घेतला असल्याचे समजते. ही गोष्ट आहे  इथिओपियाच्या फेयिसा लिलेसाची.

इथिओपियाच्या ऑलिम्पिक संघाचे सोमवारी येथे आगमन झाले. मात्र या संघातील खेळाडूंबरोबर लिलेसा दिसला नाही. खेळाडूंना मिळणाऱ्या अवमानकारक वागणुकीबद्दल लिलेसाने अनेक वेळा जाहीररीत्या विरोध दर्शविला होता. त्यामुळे त्याला शासनाकडून शिक्षा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याला कोणतीही शिक्षा केली जाणार नाही, असे आश्वासन येथील शासनाकडून मिळाले असले तरी त्याने मायदेशात परत न जाण्याचा निर्णय घेतला होता. इथिओपियाच्या क्रीडाधिकाऱ्यांनी मायदेशात परतलेल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले, मात्र त्यांच्या भाषणात कोठेही लिलेसाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

लिलेसाचा मध्यस्थ म्हणून फेडरिको रोसा हे गेली तीन वर्षे काम करीत आहेत. त्यांनी सांगितले की, ‘लिलेसाने मायदेशात जाण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. जरी शासनाने त्याला कोणतीही शिक्षा होणार नसल्याचे आश्वासन दिले असले तरी त्याने मायदेशी जाण्याचे टाळावे व अन्य देशात आश्रय घ्यावा, असा सल्ला त्याला अनेक संघटकांनी दिला होता. लिलेसाने कोणत्या देशात आश्रय घ्यायचे ठरविले आहे याची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. कारण ऑलिम्पिकमधील शर्यतीनंतर माझ्याशी त्याचे बोलणे झालेले नाही.’

लिलेसाने मॅरेथॉन शर्यत झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपण देश सोडण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले होते. लिलेसाने अमेरिकेत आश्रय घेण्याचे ठरवले असल्याचे समजते, मात्र अमेरिकन गृह खात्याने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.