भारतीय संघाचा सध्या मोहालीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सराव सुरू आहे. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, कसोटी मालिकेत ‘विजय श्री’ मिळवून संघात पसरलेले निराशाचे वातावरण दूर करण्यासाठी कर्णधार विराट कोहली प्रयत्नशील असणार आहे. त्यादृष्टीनेच विराट मोहालीच्या स्टेडियमवर सराव करण्यासाठी दाखल झाला खरा पण सरावाला सुरूवात करण्याआधी कोहलीने मोहालीच्या खेळपट्टीचे क्युरेटर दलजित सिंग यांच्यासोबत खेळपट्टीची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर दलजित यांच्या पाया पडून कोहलीने त्यांचे आशिर्वाद देखील घेतले. विराटने दिलेल्या सन्मानाने दलजित यांना भरून आले. त्यांनी विराटची पाठ थोपटून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विराटने नेट्समध्ये भरपूर घाम गाळला.

७३ वर्षीय दलजित सिंग गेल्या २० वर्षांपासून मोहालीच्या खेळपट्टीचे क्युरेटर म्हणून काम पाहत आहेत. खेळाडूंनी केलेल्या मागण्यांना नकार न देता नियमांच्या चौकटीत राहून काम करणे अशी त्यांची ओळख आहे. द.आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील भारताच्या मानहानीकारक पराभवावर नाराज होऊन संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी वानखेडेचे क्युरेटर सुधीर नाईक यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले होते. आफ्रिकने या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांचा समाचार घेत ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाला केवळ २२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवाने संतप्त झालेल्या रवी शास्त्री यांनी वानखेडेच्या खेळपट्टीचे क्युरेटर सुधीर नाईक यांना दोषी धरले होते.