“माझ्या सगळ्याच बंडांना ‘चारचौघी’नंतर सुरुवात झाली. कलाकार, नाटक, तिकिटं, तारखा मिळवणं… होय! नाटय़ क्षेत्रात तारखा मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान. तुम्ही नाटय़शास्त्राचा कितीही अभ्यास केलेला असला तरी थिएटरच्या तारखा मिळवणं कुठल्याच पुस्तकातून शिकायला मिळत नाही. त्यासाठी सुरुवातीला मला खूप झगडावं लागलंय. मला रविवार, सुट्टीचा दिवस का मिळत नाही, असा प्रश्न विचारत प्रस्थापितांशी हिमतीने लढावं लागलंय, स्वत:ला सिद्ध करावं लागलंय. माझी नाटकं चालायला लागली तसं चित्र बदललं; पण तोवर माझ्या प्रत्येक नाटकाच्या वेळी संघर्ष जणू पाचवीलाच पुजलेला.”

सर्जनशीलतेची शालीन प्रतिमा हे दुर्गामातेचं सात्त्विक रूप! तर असुरांचं निर्दालन करणारी रणचंडिका हे तिचं तापस रूप! स्रीशक्तीचा जागर करणारी अशी तिची अनेक रूपं मला नाटय़निर्मितीच्या गेल्या बत्तीस वर्षांच्या कालावधीत, पन्नासच्या वर दर्जेदार नाटय़कृतींची निर्मिती करताना साकारावी लागली. गेल्या बत्तीस वर्षांतलं प्रत्येक नाटक फक्त आणि फक्त संघर्षातून उभं राहिलंय!

माझ्या ‘श्री. चिंतामणी’ नाटय़ संस्थेच्या पहिल्या नाटकाची त्या दिवशी ग्रँड रिहर्सल होती. शिरस्त्याप्रमाणे शिवाजी मंदिर इथल्या शुभारंभाच्या पहिल्या प्रयोगाची वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यायला मी गेले, तर माझ्या या पहिल्याच नाटकाची जाहिरात अडवली गेली, कारण त्या नाटकाच्या आधीच्या प्रयोगांच्या जाहिरातीचं बिल पहिल्या निर्मात्यानं थकवलं होतं. ते चुकतं झाल्याशिवाय माझ्या नाटकाची जाहिरात घेतली जाणार नव्हती. मी तिथून निघाले. सोनाराकडे गेले. अंगावरचा एकमेव दागिना माझे तोडे विकले. थकबाकी चुकती केली आणि जाहिरात दिली. केवळ निर्माती होण्याच्या हट्टापायी कारण नसताना दुसऱ्या निर्मात्याचं कर्ज फेडावं लागलं. एवढं करून ते नाटक फारसं चाललं नाहीच.14

पुन्हा उमेदीनं दुसरं नाटक करायला घेतलं. एक बुकिंग क्लार्क थिएटरच्या तारखा सांभाळत असे. त्याला नाटय़गृहाच्या भाडय़ाचे पैसे आगाऊ दिले होते. रात्री आठ वाजता शुभारंभाचा प्रयोग. मी थिएटरवर पोहोचले. भाडय़ाची पावती अॅफिसमध्ये दाखवली. ते म्हणाले, “हे पैसे नाटय़गृहाच्या बुकिंगसाठी डिपॉझिट म्हणून दिले गेलेत. भाडं तुम्ही अद्याप भरलेलेच नाही. त्यामुळे आजचा प्रयोग तुम्हाला करता येणार नाही. आधी भाडं भरा. मग तारीख देतो.” माझ्या खिशात दमडी नाही. माझ्या त्या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाचा पडदा वर गेलाच नाही. प्रयोग रद्द झाला.

ही माझ्या करिअरची सुरुवात!

मराठी आणि गणित या विषयांची मी शाळेतली शिक्षिका, पैशाचं पाठबळ नाही. नाटय़ व्यवसायाचा ओ की ठो माहीत नाही. सुधा करमरकर माझी मैत्रीण. ती बाल रंगभूमीवर नाटकं करायची. व्यावसायिक नाटकांतून कामं करायची. रंगभूमीशी जवळीक तिच्यामुळे झाली. मी बरेचदा तिच्या नाटकांना, नाटकांच्या तालमींना जात असे. मला मुळात नाटकांची, मराठी वाङ्मयाची खूप आवड. त्या काळी नाटकंही दर्जेदार असायची. मला वाटायचं नाटकांमुळे करमणूक आणि समाजप्रबोधन दोन्हीही होतं. त्या काळी ‘नाटय़संपदा’, ‘कलावैभव’ अशा संस्थांची नाटकं जोरात चालत. सतीश दुभाषी, काशिनाथ घाणेकरांसारखे अभिनेते तेव्हा फॉर्मात होते. मी त्यांची नाटकं पाहायला जायची. तिथं पडद्यामागे सगळं छान गुडी गुडी वातावरण! त्या ग्लॉमरस वातावरणाला मी भुलले. वाटलं, आपणही या नाटय़निर्मितीच्या क्षेत्रात उतरावं. आतली दृष्टिआडची सृष्टी कोणाला माहीत? डोळ्याला पट्टी बांधून या क्षेत्रात उतरले खरी! एकापाठोपाठ असे अनुभव येत गेले की मग वाटलं, ‘आपण चूक केली की काय?’ पण तोवर वेळ निघून गेली होती. मागचे दोर कापले होते.

15एकदा नाटय़निर्मितीत उतरल्यावर नवशिकी असले, तरी दौऱयांना पर्याय नव्हता. असाच एका नाटकाचा नाशिकला प्रयोग होता. कॉन्ट्रक्टरने करंगळी दाखवून खूण केली. म्हटलं, येईल पाच मिनिटांत. कसलं काय? तो जो गेला तो पळालाच, माझे पैसे बुडवून. माझा पुढे मोठा दौरा होता. मी त्याच पावली उपाशीपोटी एस.टी. पकडली. मुंबईला आले. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी माँसाहेबांना भेटायला सांगितलं. माँसाहेबांनी एकरकमी पैसे हाती ठेवले. मी नाटकाचा पुढचा दौरा पूर्ण केला. ती आज

लता नार्वेकर निर्माती म्हणून लोकांना दिसते; पण अशा हकिकती कानावर आल्या की सहनिर्माते, नाटय़ व्यावसायिक मदत करण्याऐवजी कुत्सित नजरेने शेरे मारत. “अहो, पुरुषांचं क्षेत्र आहे. तिथे ही बाईमाणूस काय करणार? छानपैकी लाखो रुपयांचं कर्ज डोक्यावर घेईल आणि बसेल घरी?” मी चेष्टेचा विषय झाले होते; पण मला फक्त ‘माशाचा डोळा’ दिसत होता. कान बंद केले. डोळे उघडे ठेवले आणि हिंमत बांधली. आता कष्ट आणि संघर्षाला पर्याय नव्हता. मात्र याच क्षेत्रात पाय घट्ट रोवून उभं राहायचं, ही जिद्द मनात धगधगत होती.

दोन-तीन नाटकांत भरपूर मार खाल्ला. तरी युद्धभूमीवरून पळायचं नाही, हा माझा निश्चय पक्का होता. त्याच वेळी माझ्याकडे ‘तू फक्त हो म्हण’ आलं. माझ्या लक्षात आलं, आता हेही नाटक बुडालं आणि कर्जबाजारी झाले तर विष घेऊन आत्महत्याच करावी लागेल. मी सावधपणे पावलं टाकली, धोके टाळत गेले आणि नाटकाने मला तारलं. धमाल चाललं ते नाटक. विशेष म्हणजे माझ्या संघर्षातून प्रेरणा घेऊन

स्मिता तळवलकर चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरली. ‘अस्मिता चित्र’चा जन्म झाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक चांगली निर्माती मिळाली. मला याचा आनंद वाटतो. मी तिच्या पाठीशी भक्कम उभी राहिले. ‘कळत-नकळत’चं पुण्यात एक महिना सलग शूटिंग चालू होतं. त्याच वेळी ती माझ्या ‘तू फक्त हो म्हण’मध्ये काम करत होती. मी तिच्यासाठी एक महिना त्या नाटकाचे पुण्यात प्रयोग लावले आणि चक्क महिनाभर पुण्यात तळ ठोकला. ते नाटक पुण्यात जोरात चाललं होतं. स्मिता दिवसभर शूटिंग करत असे आणि रात्री माझ्या नाटकाचा प्रयोग.

आता मी उमेदीने चांगल्या संहितांचा शोध घेऊ लागले. दर्जेदार, संहितांना तोटा नव्हता; पण त्या माझ्या वाटय़ाला येत नसत. प्रथितयश संस्थांचे प्रस्थापित नाटय़लेखकांशी पक्के लागेबांधे. त्या संस्थांना संहिता दिली तर शेकडो प्रयोगांची गॉरंटी. त्यामुळे प्रत्येक नाटय़ संस्थेचे नाटय़लेखक ठरलेले. ते लेखक मला नाटक देऊन जुगार का खेळतील? मी या क्षेत्रातली लिंबूटिंबू! त्यातून ‘बाईमाणूस’! अशा परिस्थितीत

प्रशांत दळवींचं ‘चारचौघी’ नाटक माझ्या हाती आलं आणि ते नाटक माझ्या करिअरमधलं ‘मैलाचा दगड’ ठरलं. स्रीच्या भावविश्वातील नाटय़, तिची बंडखोरी रंगवणारं, काळाच्या पंचवीस वर्षं पुढचा विचार करणारं हे नाटक स्वीकारण्याची हिंमत मी दाखवली. आधी एका स्रीचे दोन पुरुषांशी भावनिक संबंध हे काही लोकांच्या पचनी पडेना; पण पुढे क्षुल्लक चुकीसाठी पुरुष स्रीला शिक्षा देतो हे पुरुषांना पटलं आणि स्त्रियांना त्या नाटकातली बंडखोरी भावली. त्या नाटकाला स्त्रियांनी उचलून धरलं. एक प्रकारे दिवाणखान्यातील नाटक स्वयंपाकघरामध्ये पोहोचलं. फारशी जाहिरात न करताही या नाटकाने महाराष्ट्र घुसळून काढला. मी बंडखोर निर्माती म्हणून ओळखली जाऊ लागले.

माझ्या सगळ्याच बंडांना तिथून सुरुवात झाली. कलाकार, नाटक, तिकिटं, तारखा मिळवणं… होय! नाटय़ क्षेत्रात तारखा मिळवणं हा सर्वात मोठा चॅलेंज. तुम्ही नाटय़शास्त्राचा कितीही अभ्यास केलेला असला तरी थिएटरच्या तारखा मिळवणं कुठल्याच पुस्तकातून शिकायला मिळत नाही. त्यासाठी सुरुवातीला मला खूप झगडावं लागलंय. मला रविवार, सुट्टीचा दिवस का मिळत नाही, असा प्रश्न विचारत प्रस्थापितांशी हिमतीने लढावं लागलंय, स्वत:ला सिद्ध करावं लागलंय. माझी नाटकं चालायला लागली तसं चित्र बदललं; पण तोवर माझ्या प्रत्येक नाटकाच्या वेळी संघर्ष जणू पाचवीलाच पुजलेला.

एखाद्या नाटकाची संहिता वाचताना वेगळी अनुभूती येते; पण तेच नाटक निर्माती म्हणून बसवताना नव्याने कळत जातं. दिग्दर्शक संहितेच्या पलीकडे ते नाटक पाहतो. त्याला अनेक जागा नव्याने सापडतात. निर्माता म्हणून अशा पद्धतीने नाटक साकार करताना त्याला लेखक संमती देतोच असं नाही. दिग्दर्शक आणि लेखकाची पटवापटवी करताना निर्मात्याला जीव नकोसा होतो. लेखकांचे इगो नडतात. मग नाटक त्यांच्या मर्जीनुसार बसवलं जातं. त्यात त्रुटी राहून जातात. तर कधी कधी मतभेद टोकाला गेल्यावर नाटक बंदसुद्धा पडतं. उदाहरणार्थ ‘रेवती देशपांडे’. पुरुषाचे हार्मोन्स बदलल्यानंतर त्याचे सगळे मॉनरिझम बदलतात, बायकी होतात. मला या नाटकाची संहिता आवडली; पण ते रंगभूमीवर आणताना- वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवायचा की भावनिक पातळीवरील संघर्ष रंगवायचा या द्विधा मन:स्थितीत आम्ही सापडलो. भावनिक संघर्ष बाल्कनीतल्या प्रेक्षकांना भावेल, पण ‘क्रीम अॅडियन्स’चं काय? आम्हाला निर्माता म्हणून सगळ्याच प्रेक्षकांचा विचार करावा लागतो. बरं त्यानुसार संहिता बदलायची तर लेखकाची तेवढी मानसिकता पाहिजे. दुसऱ्या लेखकाची मदत घेणं मूळ लेखकाला पटेना. शेवटी तालमी अर्धवट थांबवल्या. पुढे बारा वर्षं ते नाटक बासनात पडून राहिलं. दुसऱ्या कोणत्याही निर्मात्याने त्याला हात घातला नाही. निर्मातीवर विश्वास टाकून रिझल्ट चांगले येतील, हा विश्वास बाळगून सहकार्य करायला हवं की नको? किमान लता नार्वेकर या विषयाला हात घालते हा विचार तरी करायला हवा की नको? माझ्या डोक्यात मात्र किडा वळवळत होता. मी निश्चियाने ते रंगभूमीवर आणलं. लेखकाशी मतभेद झाले तरी… ‘रेवती देशपांडें’चा रंगभूमीवर असा जन्म उण्यापुऱ्या बारा वर्षांनी झाला.

नाटय़सृष्टीत मी अनेक प्रयोग केले. पहिला डायलॉग प्ले मी आणला. त्याला शब्दांची ताकद लागते. सुरेश खरें यांच्याकडे ती होती. हा वेगळा प्रयोग पाहून वसंतराव व सुमतीबाई जोगळेकर  भारावून  म्हणाले, “नाटकं इतकी चांगली असतात हे आज कळलं.” ‘तिची कथाच वेगळी’,  ‘ती वेळच तशी होती’ या नाटकांतून मी हा प्रयोग केला. त्यापैकी एका नाटकाचा विनय आपटे दिग्दर्शक होता. ‘तिची कथाच वेगळी’ या नाटकात क्लायमॅक्सला नायक-नायिका घटस्फोट घेतात. विनय आपटेला हा निर्णय ते पार्टीत घेतात असं दाखवायचं होतं, तर सुरेश खरेंचं म्हणणं, घटस्फोट घेताना कोणी पार्टी देईल का? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “हे नाटक करायचं नाही.” आता झाली का पंचाईत! नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग चार दिवसांवर आला. दोघंही एका सीनवर अडून बसलेले. एक दिवस दिलीप कोल्हटकर माझ्या नाटकाच्या तालमीला आला. म्हणाला, “हे काय? तालमी का बंद पडल्यात?” मी त्याला सर्व सांगितलं. त्या रात्री दिलीप, विनय, चंद्रकांत मेहेंदळे, सुरेश खरे आणि मी अशी सगळ्यांची वादळी चर्चा झाली, जिप्सीत. या चर्चेत दिलीपने एक तोडगा सुचवला. पार्टीऐवजी नायकाचे चार मित्र आणि नायिकेच्या चार मैत्रिणी एकत्र येतील. मित्र-मैत्रीण म्हणून ते दोघे कितीही चांगले असले तरी पती-पत्नी म्हणून ते नाही एकमेकांशी सुसंवाद साधू शकत आणि ते घटस्फोटाचा निर्णय सर्वांच्या साक्षीने घेतील. लेखक व दिग्दर्शकाने एकमेकांशी हात मिळवले आणि निर्मातीचा जीव भांडय़ात पडला.

व्यक्तिश: मला अशी आव्हानं घ्यायला फार आवडतात. कोणत्याही निर्मात्याने एक हिट नाटक दिलं की, प्रेक्षकांपासून नाटय़ व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात. ‘चारचौघी’नंतर पुढचं नाटक करताना हा दर्जा सांभाळणं किती कठीण आहे हे कळलं. माझ्या नाटकांचा पोत बघून लेखक-दिग्दर्शक स्वत:हून संहिता घेऊन येऊ लागले; पण मला ‘चारचौघी’च्या तोडीचं नाटक मिळेना.  प्रेक्षकांना मी ‘चारचौघी’ची मेजवानी खिलवली होती. ‘पाऊल न वाजवता’ची दालखिचडी काही त्यांच्या पचनी पडेना. तरी मी ४५० प्रयोग केले. त्यानंतर माझ्या हाती नाटक आलं, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’. देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह मांडणाऱ्या या नाटकात लेखकाने वा निर्मात्याने कोणतंही भाष्य केलं नाही. त्यामुळे आस्तिक व नास्तिक दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना नाटक भिडलं. त्या नाटकात एका प्रसंगात दारू पिताना नायक देवावर दारू उडवतो, असं दाखवलं होतं. नाटक स्वीकारलं तेव्हाच मी ते विजया मेहतांना वाचायला दिलं होतं. नाटक बघताना हा प्रसंग इतका अंगावर येई की, त्यांनी मला विचारलं, “लता, हा प्रसंग तू नंतर टाकलास का?” माझ्या एका प्रयोगाला आशा भोसले आणि उषा किरण आल्या होत्या. नाटक संपल्यावर दोघी आत आल्या. उषा किरण म्हणाल्या, “नायिका इतकी आस्तिक असूनही शेवटी नवऱ्याचं घर सोडताना ती देव बांधलेलं गाठोडं त्याच्या घरी सोडून येते हे मला खटकलं.” म्हटलं, “नायिकेचं, नवरा दारू पितो हे शल्य नाही. दारूमुळे, पैशामुळे त्याचं माकड झालंय. त्याच्यातला माणूस मेलाय हे तिचं शल्य आहे. तो त्रागा, ते वैफल्य या कृतीतून ती दाखवते.” उषा किरण यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, “अशी नाटकं करण्यासाठी लताला उदंड आयुष्य दे, अशी मी देवाची प्रार्थना करते.” थोरामोठय़ांचे हे आशीर्वादच माझं बळ आहे.

हे जुनेजाणते कलाकार रंगभूमीशी किती इमान राखून असतात. ‘जावई माझा भला’ या नाटकात दिलीप प्रभावळकर काम करत. नंतर ती भूमिका विक्रम गोखले करू लागले; पण तसं करताना त्यांना कुठेही कमीपणा वाटला नाही, कारण आपली व्यक्तिरेखा साकारताना आपण काही तरी वेगळं करू शकतो, हा त्यांचा आत्मविश्वास! त्यांच्या अभिनयात ती ताकद असते आणि चांगली भूमिका, चांगलं स्क्रिप्ट मिळावं, ही त्यांची आंतरिक तळमळ असते. हल्लीच्या मुलांमध्ये ही प्रगल्भता आहे? ही मुलं माझ्याबरोबर काम करणारा दुसरा नट भाव खाऊन जातो, तो क्ल्यू देत नाही. त्याला टाळ्या जास्त मिळतात, त्याला लाफ्टर जास्त येतो, त्याला ताबडतोब बदला, असं निर्मात्याला धमकावून नाटक बंद करायचा प्रयत्न करतात. कलाकारांच्या ‘इगो’चा खेळ होतो आणि नाइलाजाने १५-२० लाख घालून रंगभूमीवर आणलेलं नाटक निर्मात्याला बंद करावं लागतं. रिप्लेसमेंटला नकार देणं, दौऱ्यावर रूम शेअर न करणं याचा नाटकाच्या दौऱ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.

पूर्वीच्या अभिनेत्री खूप सहकार्य करायच्या.

पद्मा चव्हाणांना मी एका नाटकात घेतलं तेव्हा अनेकांनी मला घाबरवलं. पद्मा चव्हाण यांची त्वचा मुलायम आहे. त्यामुळे त्या उन्हातून येणार नाहीत. दुपारचे प्रयोग करणार नाही. त्यांना गाडी द्यावी लागेल. त्या कंपनीच्या बसमधून प्रवास करणार नाहीत; पण माझ्याकडे त्यांनी दुपारीही प्रयोग केले. बसमधूनही प्रवास केला. साखर कारखान्यांचे धुवांधार प्रयोग केले आणि कधीही आयत्या वेळी माझा प्रयोग रद्द केला नाही. माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम होतं की, त्यांनी मला किमती साडय़ा भेट दिल्या. प्रेमाने बदामी चिकन खाऊ घातलं.

वंदना गुप्ते ही अशीच कलाकार. माझ्या एका नाटकात ती होती. त्या नाटकाचा दौरा लागलेला. आदल्याच दिवशी अमर वर्माचं निधन झालं. मी दिवसभर तिथे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा माणिक वर्मांना भेटायला गेले. मी सचिंत होते. कॉन्ट्रक्टरला विक्री थांबवायला सांगावं, दौरा रद्द करावा. काय करावं काहीच सुचत नव्हतं. वंदना हळूच माझ्याजवळ आली. माझा हात धरला. म्हणाली, “बाई, उद्या दौऱ्याला किती वाजता निघायचं?” माझे डोळे पाणावले. ‘तिची कथाच वेगळी’ मध्ये स्मिता तळवलकर, सविता प्रभुणे, विनय आपटे, प्रदीप वेलणकर अशी टीम होती. दौऱ्यावर निघायच्या दोन दिवस आधी प्रदीपचे वडील वारले. तो वडिलांचा एकुलता एक मुलगा. पुन्हा तोच प्रश्न. इंदौरचा नियोजित दौरा रद्द करावा का? पण प्रदीपने निक्षून सांगितलं, “लताबाई, दौरा रद्द करायचा नाही. माझ्या वडिलांचे विधी माझ्या बहिणीचे यजमान करतील. शो मस्ट गो अॅन.” हे खरे रंगभूमीचे पाईक!16

मी माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला- मग तो कुठेही असो जातीने हजर असते. एकदा पुण्यात ‘बालगंधर्व’ला एका नाटकाचा प्रयोग होता. त्यात स्मिता तळवलकर होती. ती तेव्हा नुकतीच निर्माती झाली होती. तिला भेटायला दोन माणसं आली होती.  ते दोघे दारू पिऊन तर्र होते. त्यांचा काही तरी पैशांचा वाद होता. मला त्यांच्या व्यवहाराशी काहीही देणं-घेणं नव्हतं; पण माझ्या नाटकाच्या प्रयोगात ‘राडा’ होऊन चालणार नव्हतं. मी स्मिताला मेकअपरूम मध्ये कडी लावून बंद केलं. बॉकस्टेजच्या लोकांकरवी त्या दोघांना हळूहळू थिएटरबाहेर काढलं.  तोवर स्टेजवर स्मिताच्या एन्ट्रीची वेळ आली होती. मी सविता प्रभुणेला हे खाणाखुणा करून सांगत होते. ती एकटी किती तरी वेळ किल्ला लढवत होती. हॉट्स अॅफ टू हर! ‘तू फक्त हो म्हण’च्या वेळी एक इंटिमेट बेडरूम सीन चालू होता. बाल्कनीतल्या प्रेक्षकांमधून एक दारूची बाटली त्यांच्या दिशेने भिरकावली गेली. मी तत्काळ प्रयोग थांबवला. बाल्कनीतल्या सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढलं. नंतरच प्रयोग सुरू केला.

रंगभूमीवर नाटक सुरू असताना पडद्यामागे अनेक घटना घडत असतात. एकदा एका आर्टिस्टला ताप आला. तिची प्रमुख भूमिका. म्हणाली, “मी प्रयोग करणार नाही.” वंदना गुप्तेने तिला ठणकावलं, “गोळी घे आणि राहा उभी प्रयोगाला.” एका नाटय़ प्रयोगात प्रतीक्षा लोणकरला १०४ डिग्री ताप. तिला विचारलं, “काय करायचं?” ती म्हणाली, “तोंडाला रंग लागला की ताप पळेल.” खरंच तसंच झालं. या सगळ्या अभिनेत्री आपल्या एन्ट्रीच्या कपडय़ांची, दागिन्यांची चोख तयारी करतात. प्रयोगाआधी पाहणी करतात. आता दिवस बदलले आहेत.

आज निर्माता कलाकार-शरण झालेला आहे. पैशांच्या जोरावर नाटय़निर्मितीत उतरलेल्या मंडळींना रंगभूमीच्या भवितव्याशी देणं-घेणं नाही. त्यांना फक्त आर्थिक गणितं कळतात. त्यातूनच नटांना फोडण्याची कारस्थानं सुरू झाली. तारखा विकत घेणं सुरू झालं. कलाकारांचे फाजील लाड करणं सुरू झालं. हे सगळं कमी म्हणून की काय अवैध गोष्टींचं जणू विद्यापीठ असलेल्या निर्मात्यांनी कलाकारांना नफ्यामध्ये ‘शेअरिंग’ देणं सुरू केलं. कलाकारांची दिवाळी झाली. निर्मात्यांचा शिमगा झाला. मी शेअरिंगच्या विरुद्ध आहे. निर्मात्यांच्या नफ्यात शेअरिंग हवं तर त्याच्या तोटय़ामध्ये शेअरिंग मागाल का? निर्माता नोटांची थप्पी घरी नेताना दिसतो; पण त्याच्या एका यशस्वी नाटकातून तो आधीच्या दहा तोट्यात गेलेल्या नाटकांचा खर्च भरून काढत असतो. शेवटी निर्मात्याची झोळी रिकामीच असते. नाही तर तोही बीएमडब्ल्यू, मर्सिडीजमधून फिरला असता की!

रंगभूमी फक्त कलाकारांच्या हाती नाही. उत्तम संहिता, निर्मिती हेही महत्त्वाचं आहे. नेपथ्य, लाइट, म्युझिक, स्च्युम या गोष्टी नाटकाला पुढे नेतात. आज प्रेक्षक ज्या सेलेब्रिटी स्टारसाठी दामदुप्पट किंमत मोजतात त्यांची पात्रता काय नानासाहेब फाटक, सतीश दुभाषी, शंकर घाणेकर यांच्या तोडीची आहे? स्टेजवर उडय़ा मारून लाफ्टर खेचणं म्हणजे अभिनय? दूरचित्रवाणीवर दहा मिनिटांचं स्कीट करणारा कलाकार सवा दोन तासांचं नाटक नाही पेलू शकत, पल्लेदार संवाद नाही झेपू शकत ही वस्तुस्थिती आहे. असा सवंग अभिनय प्रेक्षक उचलून धरतो, ही खरी शोकांतिका आहे. सेलेब्रिटी स्टार्सच्या भरभक्कम नाइटपायी तिकिटांचे दर वाढतात, थिएटर्सची भाडी वाढतात, तारखांचे भाव चढतात. तूरडाळ साठ रुपयांवरून तीनशे रुपयांवर गेली की आंदोलन करणारे आम्ही- नाटकांच्या तिकिटांचे दर शंभर रुपयांवरून पाचशे-सातशेवर गेले तरी रांगा लावून तिकीट घेतो. अशा एका महागडय़ा नाटकापायी कमी दर असलेली पुढचीमागची तीन नाटकं मरतात. त्याचं काय?

रंगभूमीला आलेली ही सूज उतरवणं… तिला पुन्हा खरंखुरं ऐश्वर्य प्राप्त करून देणं मायबाप प्रेक्षकहो, फक्त तुमच्या हाती आहे.

लता नार्वेकर – नाटय़निर्माती

शब्दांकन: माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com