भारताची आकडेवारी पाहिली तर शहरी, शिकलेल्या, प्रौढ लोकांमध्ये गरजेपेक्षा वजन जास्त असणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ६० टक्के आहे. इतकेच नव्हे तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे प्रमाणही वाढत चालले आहे. शाळेतल्या उपहारगृहातून जंक फूड बंद करण्याचा शासनाचा निर्णय काही प्रमाणात हे प्रमाण आटोक्यात आणू शकेल, परंतु खरी गरज आहे त्यामागची कारणे समजून घेण्याची. एकदा त्यातले गांभीर्य समजले तर फक्त उपहारगृहातूनच नाही तर आपल्या आयुष्यातूनही आपण जंक फूड हद्दपार करू शकू..

खरे तर जंक फूड हा शब्दच फसवा व विरोधाभासी आहे. कुठलेही अन्न हे जंक कसे काय असू शकते? जंक या शब्दाचा अर्थच मुळी भंगार, टाकाऊ  असा होतो व कुठलीही खाण्याची वस्तू ही अशी असणे शक्यच नाही. तरीही जंक फूड हा शब्द इतका प्रचलित झालेला आहे की त्यामधील विरोधाभास सहज लक्षातपण येत नाही.

खरे तर मनुष्य जन्माला आल्यापासून तो अखेरचा श्वास घेईपर्यंत खातच असतो व तेही दिवसातून किमान ३ वेळा. याचा अर्थ मनुष्याचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे धरले तर त्याच्या संपूर्ण आयुष्यात साधारणपणे ८८ हजार वेळा खाण्याची क्रिया घडते. एखादी गोष्ट इतक्या वेळा करताना, त्यात झालेली जराशी चूक ८८००० वेळा पुन: पुन्हा होण्याची शक्यता असते. या छोटय़ाशा चुकीचे साचत गेलेले परिणाम हे प्रचंड मोठे, दीर्घकालीन व अतिशय गंभीर स्वरूपाचे असू शकतात हे समजणे गरजेचे आहे. खरे तर मनुष्य आपल्या आयुष्यात जी गोष्ट इतक्या वेळा करतो, त्यामध्ये तो स्वत:च तज्ज्ञ असायला पाहिजे. दुर्दैवाने तशी परिस्थिती नसल्याचे दिसून येते.

भारतामधीलच आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की, आज शहरी, शिकलेल्या, प्रौढ लोकांमध्ये गरजेपेक्षा वजन जास्त असणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ६० टक्के आहे. अगदी भारतीय तरुणांमध्ये वा शाळकरी मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाणही वाढतच चालले आहे. एवढेच नव्हे तर दोन वर्षे वयाच्या आतील मुलांमध्येही वजन जास्त असण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच आहे. गरजेपेक्षा जास्त वजन असण्याचे परिणाम म्हणून आज भारतीय लोकांमधील मधुमेह, उच्च रक्तदाब वा हृदयविकारासारख्या आजारांचे प्रमाणही वाढते आहे. आज शहरी, शिकलेल्या, प्रौढ लोकांमध्ये १०० पैकी १४ लोकांना मधुमेह, २५ लोकांना उच्च रक्तदाब तर १२ लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. शिवाय हे आजार होण्याचे वयही मागील दोन दशकांमध्ये वयाची २५-३० वर्षे इतकं खाली आलेलं आहे. हे होण्याची महत्त्वाची कारणे म्हणजे बदलत/बिघडत चाललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, घटते शरीरश्रम, लहान वयापासूनच असलेला मानसिक तणाव व एकूणच आयुष्याचा वाढलेला वेग व जगण्यातील अर्थहीनता ही होत.

त्यापैकी आपल्या खाण्याच्या चुकीच्या व बिघडलेल्या सवयी हा एक खूप महत्त्वाचा व सहज दुरुस्त करता येण्यासारखा घटक आहे. आहारशास्त्राचे मूलभूत नियम आपण समजून घेतलेत व ते मुलांनाही समजून सांगू शकलो तर या समस्येवर मात करणे शक्य होऊ  शकते. त्यासाठी त्यांना समजेल व पटेल-रुचेल अशा भाषेत विज्ञान मांडता आले पाहिजे. केवळ जंक फूड वाईट व ते खायला नको, असे म्हणून चालणार नाही. तर जंक फूड म्हणजे नेमके काय, त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात व त्याला काय आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत हे सर्व या सवयी बदलण्यासाठी उपयोगी ठरेल.

जंक फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात व शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्यामानाने अतिशय कमी प्रमाणात असतात व प्रसंगी नसतातसुद्धा. मुख्यत्वे कबरेदके व मेदाचे(फॅट्स) प्रमाण बरेच जास्त असते. शिवाय अन्नावर खूप जास्त प्रक्रिया केलेली असल्यामुळे त्यामध्ये अनेक आरोग्यासाठी नुकसानकारक विषारी घटकसुद्धा तयार होतात. शिवाय हे पदार्थ ताजे दिसले पाहिजेत व जास्त काळ टिकले पाहिजेत यासाठी त्यावर केल्या जाणाऱ्या अनेकविध प्रक्रिया व वापरावी लागणारी संरक्षकं वा प्रिझर्वेटिव्ह्स यामुळे ते आरोग्यासाठी आणखीनच हानिकारक ठरतात.

समोसा-कचोरी, वडापावसारखे जास्त तळले गेलेले पदार्थ, मैद्यापासून तयार होणारे बहुतेक सर्व बेकरी उत्पादित पदार्थ, चाट व तत्सम पदार्थ, पिझ्झा-बर्गर, नूडल्स, मंचुरियन, सॉफ्ट ड्रिंक्स, आइस्क्रीम, बर्गरचा समावेश जंक फूडमध्ये करता येईल. अर्थात केव्हा तरी हे पदार्थ प्रमाणात खाल्ले तर काही बिघडेल असे नाही. पण जर हेच पदार्थ आठवडय़ातील जास्त दिवस खाण्यात आले तर मात्र अपायकारक ठरतील. खासकरून लहान मुले व तरुणाईचा ओढा जंक फूडकडे जास्त आहे. जंक फूडचे आकर्षण जास्त असण्याची कारणे विविध आहेत. आकर्षक पॅकेजिंग, जाहिराती, ते उपलब्ध असतात तेथील वातावरण हे सर्व तरुणाईला आकर्षित करणारे असते. हल्ली तर महानगरांमधील खूपसे तरुण पालक, अगदी कौतुकाने आपल्या छोटय़ा बाळांना घेऊन असल्या ठिकाणी आठवडय़ातील काही दिवस तरी खादाडी करत फिरत असतात. हे सर्व अगदी कळत नसतानाच्या वयात पाहिलेली मुलेमुली थोडी मोठी झाल्यावर जंक फूडच्या आहारी नाही जाणार तर आणखी काय होणार?

जंक फूडचे प्रस्थ वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आज जीवनाची एकूणच वाढलेली गती हे होय. पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असतात, त्यामुळे मुलांना व बऱ्याचदा स्वत:साठीसुद्धा घरच्या घरी काही खाण्यासाठी बनविणे कठीण जाते. अशा वेळी जे खाण्यासाठी तयार आहेत असे अन्नपदार्थ बाजारातून आणून खाणे वा बाहेर खायला जाणे हा सहज सोपा पर्याय निवडला जातो. हल्ली अनेक घरांमधून आठवडय़ातून बऱ्याचदा असे होत असल्याने हळूहळू अशा जंक फूडची सवय व्हायला लागते वा पुढे ते आपल्या आहाराचा नियमित हिस्सा बनतात. कालांतराने जंक फूडचे अपायकारक परिणाम लक्षात आले व दिसायला लागले तरी ही सवय व्यसनासारखी सोडविता सुटत नाही.

आणखी एक ट्रेंड हल्ली महानगरांमध्ये बळावताना दिसतोय. जिम, एरोबिक सेंटर एका मजल्यावर तर पिझ्झा-बर्गर व तत्सम फास्ट फूडची दुकाने त्याच इमारतीमधील दुसऱ्या एका मजल्यावर. हे परस्परविरोधी सहनिवास एकत्र आल्याने एकातून दुसऱ्यात प्रवेश सहजच होतो. मॉर्निग वॉक वा अन्य कुठला तरी व्यायाम करून झाल्यावर श्रमपरिहारासाठी काही तरी पोटात टाकण्याची व्यवस्था बहुतेक सर्वच लहानमोठय़ा शहरांत उपलब्ध असते व अशा सवयी बऱ्याच व्यायामप्रेमी मंडळींमध्येपण जडलेल्या दिसतात.

जंक फूडची सवय मुळात लागूच नये वा लागलेली असेल तर ती सुटावी यासाठी खालील काही आहारशास्त्रविषयक मूलभूत तथ्ये सर्वानी समजून घेतली तर सोपे होते.

हल्ली आपण फार घाईघाईत खाणे उरकतो. कारण एकूणच कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम हे आजच्या जमान्यातील कार्यक्षमतेचे निदर्शक मानले जाते. जीवनाच्या अन्य क्षेत्रांत हे खरे असले तरी खाण्याच्या संदर्भात मात्र ते चुकीचे आहे. एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे असा जो पुरातन काळापासून आपण ऐकत आलेला नियम आहे तो वैज्ञानिकदृष्टय़ा अगदी खरा आहे. असे चावून खाल्ल्याने एक तर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एन्झाइम असते जे कबरेदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून चावून खाल्ले, तर आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधान पावते व कमी खाऊनही पोट भरल्याचे समाधान होते. खाणे आपोआपच कमी होते. म्हणून नियम करा की निदान २० पेक्षा जास्त वेळा चावल्याशिवाय गिळायचे नाही. त्यासाठी खाण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटांत जर खाणे संपवून उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे बसा. म्हणजेच हळूहळू खा. जास्त वेळा चावून खा.

चव समजणाऱ्या ग्रंथी जिभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जिभेच्या या भागावर

जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जिभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जिभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसन खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय! त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वासह अन्नाचा आस्वाद घेणे महत्त्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक खाण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून खात राहिल्यास खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.

आपले पोट-जठर हे व्हॉल्यूम सेन्सिटिव्ह (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरले जाणे महत्त्वाचे. कारण ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणाऱ्या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदाहरणार्थ सूप, ताक, सलाड, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे. हे सर्व आपल्या खाण्यामध्ये असतील तर साहजिकच इतर अन्नपदार्थ कमीच खाल्ले जातील व मग थोडेफार जंक फूडही खाल्ले गेले तरी फारसे बिघडणार नाही. म्हणजेच जंक फूड कधी खायचेच झाले तर थोडेफार आधी एखादे फळ, ताक, कुठला तरी नैसर्गिक ज्यूस असे घेतले तर आपोआपच नंतर खाल्ल्या जाणाऱ्या जंक फूडचे प्रमाण कमीच राहील. शिवाय मग खाताना किती खाऊ असा विचार करण्याचीपण फारशी गरज राहणार नाही.

भूक लागल्यावर हाताशी काही तरी खाण्याचे पदार्थ तयार असणे महत्त्वाचे असते. घरी लाडू-चिवडासारखे पदार्थ तयार करून डब्यामध्ये भरून ठेवलेले असणे किंवा फ्रिजमध्ये कुठल्या तरी खाण्याच्या वस्तू जसे फळे व अन्य काही तयार असल्यास भूक लागल्यावर यातील काही तरी पोटात टाकता येते. हे तयार नसले तर मग साहजिकच जंक फूडकडे मोर्चा वळतो.

व्यायाम, योगासनांसारख्या आरोग्यदायी सवयी जर स्वत:ला लावून घेतल्या तर जंक फूडकडे वळण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. साधे पायी चालणे, सायकलिंग, पोहणे, एरोबिक्ससारखा एखादा व्यायाम प्रकार नियमितपणे केल्यास किंवा कुठला तरी मैदानी खेळाचा छंद जोपासला तर दिनचर्या थोडी जास्त नियमित व आरोग्यपूर्ण व्हायला मदत होते. शिवाय व्यायामाचे जे फायदे असतात तेपण सोबत मिळतातच.

तणावाचे व्यवस्थापन : जंक फूडकडे वळण्याचे आणखी एक कारण म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी उद्भवला जाणारा तणाव. हल्ली जगण्याचा वेग प्रचंड वाढलेला असल्याने व एकूणच जगणे जास्तच गुंतागुंतीचे झालेले असल्याने तणाव निर्माण होण्याचे प्रसंग तर वाढलेच आहेत. शिवाय तणावाची पातळीसुद्धा. विशेष म्हणजे हल्ली तणावग्रस्त होण्याचे प्रसंग अगदी लहान वयापासूनच येत राहतात. बऱ्याचदा तणावाची योग्य प्रकारे हाताळणी नाही करता आली तर मग जंक फूडचा उपयोग तणाव कमी करण्याचे साधन म्हणून केला जातो. अशा कारणांनी जडलेली जंक फूडची सवय सुटणे हे एक मोठे आव्हान असते. त्यासाठी सुयोग्य पद्धतीद्वारे तणावाचे व्यवस्थापन करायला शिकणे महत्त्वाचे असेल.

योग, ध्यान, व्यायाम, समुपदेशन, मानसोपचार यासाठी कमी पडू शकतात. एखादा छंद जोपासणे हापण एक प्रभावी उपाय असू शकतो.

आयुष्याचे ध्येय निश्चित करणे : बऱ्याचदा एखाद्या चुकीच्या सवयींपासून मुक्तता मिळविण्यासाठी केवळ त्या सवयीपुरता विचार करून भागत नाही. तर त्या सवयीचे एकूणच आयुष्यावर होणारे विविधांगी बरेवाईट परिणाम काय असतील या प्रकारे विचार करणे उपयुक्त ठरते. ते संपूर्ण चित्र डोळ्यापुढे आले तर त्या सवयींपासून मुक्तता मिळणे सोपे जाते.

ch15यासंदर्भात मला माझेच स्वत:चे वैयक्तिक उदाहरण द्यायला आवडेल. जीवनशैली व आरोग्य हा माझा अभ्यासाचा एक विषय राहिलेला आहे. या विषयासंदर्भात बऱ्यापैकी वाचन, अनुभव असल्याने मला हे कळलेले होते की मानवी शरीररचना ही १२० वर्षे निरामय जगण्यासाठी बनविलेली आहे. मी माझ्यासाठी ध्येय ठरवलेले आहे की मला वयाच्या शंभरीपर्यंत तर काम करायचे आहे. ७ मे २०६१ ला माझा १०० वा वाढदिवस असेल वा तो मी साजरा करत असल्याचे चित्र कायम माझ्या डोळ्यापुढे असते. मी गेली ३३ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे व ते काम माझे अत्यंत आवडते व आनंद देणारे आहे. नुकतेच म्हणजे या ७ मेला मी माझ्या वयाची ५६ वर्षे पूर्ण केलेली आहेत. माझ्याकडे आता फक्त ४४ वर्षे माझ्या आवडत्या व अर्थपूर्ण कामासाठी शिल्लक आहेत. ही बाब मला स्पष्ट झाल्यापासून आरोग्यदायी सवयी वा जीवनशैलीपासून परावृत्त होण्याचे जे अधेमधे व्हायचे तेपण कमी होत चालले आहे. त्यामुळे आयुष्याचे दूरगामी उद्दिष्ट स्पष्ट करून घेणे आरोग्यपूर्ण सवयी टिकविण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

हल्ली जंक फूडशी संबंधित एक महत्त्वाची समस्या म्हणजे वाढलेले वजन कसे कमी करावे ही होय. हा प्रश्न अनेकांना सतावतो व खूप सारे प्रयत्न करूनसुद्धा यश न मिळाल्याने शेवटी हताश होऊन प्रयत्न करणेच सोडून दिले जाते असे अनेकांच्या बाबतीत घडताना दिसते. यासाठीच्या काही टिप्स..

वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षाही जास्त वाढते. खाणे कमी न करतासुद्धा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजीपण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. तेलतुपादी स्निग्ध पदार्थ व साखर हे ज्या खाद्यपदार्थामध्ये जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ मुख्यत्वे मोजून खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारसे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत.

एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यांसारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.

वजन कमी करताना फार घाई करू नये. साधारणत: दर आठवडय़ाला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशा प्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे.

वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वासाठीच हितकर असल्याने, घरातील सर्वानीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील.

वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्यत्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करून स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही.

शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहोचविण्यासाठी हृदयावरील ताणही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्त्वाचे असते.

बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी स्निग्ध पदार्थाची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणाऱ्या स्निग्ध पदार्थाचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. जंक फूडसोबतच मसालेदार र्तीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बऱ्याचदा वरून घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्ध पदार्थाचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रूपांतर होते व वजन वाढते.

हे झाले दिसणाऱ्या स्वरूपातील स्निग्ध पदार्थाबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्ध पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई. हेपण रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थाचा हिशोब करताना मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात.

यावर खात्रीलायकरीत्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीतजास्त माणशी ६०० मि.ली. असा हिशोब करूनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढय़ातच सर्व भागवावे.

साखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्रॅम साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील.

कॅलरीज्चा हिशोब तर सगळीकडेच मांडला जातो. पण त्यावरून फारसे काही लक्षात येत नाही. अनुभवाने आम्ही त्यामध्ये एक कॉलम जास्तीचा जोडला की इतक्या कॅलरीज् खर्च करायला किती किमी पायी चालावे लागेल. त्यामुळे एक कप चहा = ६० कॅलरीज् = १२०० मीटर चालणे, २ बिस्कीट = ५० कॅलरीज् = १ किमी चालणे, १ समोसा = २०० कॅलरीज् = ४ किमी चालणे. या स्वरूपात हा हिशोब मांडल्याने जे कॅलरीज्चे गणित अनेक शिकल्यासवरलेल्यांना समजत नाही ते या प्रकारे मांडल्याने अगदी नर्सरीच्या मुलालापण समजते असा अनुभव आहे. हे समजून घेणे ही बदलाची पहिली पायरी आहे.

डॉ. अविनाश सावजी, गेल्या ३३ वर्षांपासून डॉक्टरी व्यवसायाबरोबरच औषधांचा फारसा वापर न करता निरामय व स्वस्थ जीवन कसे जगावे, आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा, आजारी पडूच नये यासाठी काय करावे, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेहासारखे आजार कसे टाळावेत, याबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्याने व शिबिरांद्वारे जनजागृती करीत आहेत. त्यांची ‘शतायुषी व्हा’ व ‘यशस्वी व्हा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

डॉ. अविनाश सावजी sevankur@gmail.com